आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरी चळवळीतील नेते म्हणाले, नामविस्तार दिन सोहळा शांततेत होईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा रविवारी होणारा २४ वा नामविस्तार दिन सोहळा शांततेत व्हावा, यासाठी पूर्ण तयारी केली आहे. २५०० पोलिस, ४००० विशेष पोलिस अधिकारी, २ राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात केल्या असून ५० सीसीटीव्ही, ४ ड्रोनद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. शिवाय २५ फिक्स पॉइंट, स्वतंत्र मदत केंद्र असेल, असे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी (१२ जानेवारी) घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले. त्यावर आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेते म्हणाले, नामविस्तार दिन शांततेत होईल.

 

कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबवलेे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नामविस्तार दिन सोहळ्यास कोणतेही गालबोट लागू नये, या दृष्टीने यादव यांनी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सम्राट अशोक सभागृहात दुपारी चार वाजता आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. आतापर्यंत अशा बैठका उपायुक्त स्तरावर होत होत्या. यंदा आयुक्तांनी स्वत: उपस्थिती लावली. या वेळी गंगाधर गाडे यांच्यासह राजू शिंदे, गौतम खरात, सुनील मगरे, नितीन वाकेकर, यशवंत घाटे, कृष्णा बनकर, संजय ठोकळ, बाबा तायडे, अरुण बोर्डे, पंडित नवगिरे, अशोक कांबळे, मनोज वाहूळ, नागराज गायकवाड, श्रावण गायकवाड, बाबूराव कदम, दिनकर ओंकार, मिलिंद दाभाडे तसेच पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त, चंपालाल शेवगण, ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, हनुमंत भापकर, निरीक्षक कैलास प्रजापती, श्रीपाद परोपकारी, ज्ञानेश्वर साबळे, राजश्री आढे यांची उपस्थिती होती. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सूत्रसंचालन केले.

 

दोनच मंचांच्या निर्णयाचे केले स्वागत : मागील २३ वर्षांपासून नामविस्तार दिन सोहळ्यात २० पेक्षा अधिक मंच उभारण्याची परंपरा होती. ती मोडीत काढून विविध संघटना आणि पक्षांच्या तरुणांनी 'एक विचार एक मंच'साठी पुढाकार घेतला. त्याला रिपाइं आठवले गट वगळता सर्वांनी पाठिंबा दिला. त्यामुळे यंदा फक्त दोन मंच असतील. याबद्दल पोलिस आयुक्तांनी सर्व नेत्यांचे स्वागत केले.

 

तणाव होता तेथेही बंदोबस्त : नामविस्तार दिन सोहळ्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार सुप्रिया सुळे येण्याची शक्यता आहे. सोहळ्याच्या ठिकाणी तीन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस उपायुक्त, २६ पोलिस निरीक्षक, ७५ उपनिरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांचीही नजर राहील. १ ते तीन ३ जानेवारीदरम्यान ज्या ज्या भागात तणाव होता, तेथेही बंदोबस्त, सीसीटीव्हीची निगराणी असेल. रविवारी दर दोन तासांनी बॉम्बशोधक व नाशक पथक नामविस्तार सोहळा घटनास्थळाची तपासणी करेल.


ड्राय डेची सूचना
१४ जानेवारीला मद्यविक्री थांबवावी, असे पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले. कोठेही गडबड आढळल्यास १०० क्रमांकावर संपर्क साधा. सहायक पोलिस आयुक्त उपलब्ध असतील, असेही ते म्हणाले.


नेत्यांचा सूर
- कोम्बिंगमुळे लोक त्रस्त आहेत. हे धरपकड सत्र थांबवा. ३०७ कलम लावू नका. नामविस्तार सोहळ्यात बाहेरच्या लोकांनी गडबड केली तर तुम्ही आमच्यावरच लाठ्या चालवणार.
- पुस्तक, सीडी आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी स्वतंत्र जागा द्या. व्यसनमुक्ती जागरूकता अभियान राबवा.
- मकई गेट, पाणचक्की आणि मिलकॉर्नर येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये, याची काळजी घ्यावी.
- मिलिंद महाविद्यालय परिसर, इतर खुल्या जागांवर वाहने पार्किंगची सोय व्हावी.
- रात्री उशिरापर्यंत रिक्षा, एसटी उपलब्ध करून द्या. अग्निशमन दल सज्ज ठेवा. इंटरनेट बंद ठेवा.


आयुक्तांचे उत्तर
सबळ पुरावे असणाऱ्यांवर कारवाई होणारच. निरपराधांना, स्वत:हून शरण येणाऱ्यांना त्रास होणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू नाही.


आम्ही येऊ-जाऊ, मात्र शहराचे काय
पोलिस अधिकारी दोन-चार वर्षांसाठी येऊन जातात. मात्र, दंगलीचे पडसाद अनेक वर्षे उमटत राहतात. राज्यातील सर्वात शांत आणि सुरक्षित शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण करून देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.
- यशस्वी यादव, पोलिस आयुक्त.

 

बातम्या आणखी आहेत...