आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएचा अभ्यासक्रम सोपा करा : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांचा सीए संघटनेला सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ज्या देशात लाखो अभियंते पास होतात तेथे देशाला गरज असूनही सीएचा निकाल अवघा दोनच टक्के का लागतो? तो वाढवण्यासाठी अभ्यासक्रम थोडा सोपा करा, असा सल्ला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी शनिवारी (१६ जून) सीए संघटनेला दिला. 


औरंगाबाद येथील चार्टर्ड अकाउंटंट्स संघटनेतर्फे आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद््घाटनसत्रात सीए संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी आम्हाला आयकर विभागात व्हॅल्युअर म्हणून सरकारने डावलले, पूर्वी ऑडिटचे वाटप रिझर्व्ह बँक करत होती. आता ती जबाबदारी त्यांच्याकडून काढल्यापासून त्यात दुजाभाव होत आहे. देशाची राज्यघटना तयार झाली नव्हती, त्याआधी सीए संस्थेची स्थापना झाली. त्याला ७० वर्षे होत आहेत. आम्हाला सरकारने सहकारी म्हणून सोबत घ्यावे, असे मुद्दे मांडले. त्याचा धागा पकडत शुक्ला म्हणाले की, जीएसटी कायद्यानंतर देशात खूप सीएंची गरज भासत आहे. अशा वेळी देशात फक्त तीन लाख सीए आहेत, ही अभिमानाची किंवा हसण्याची बाब नाही. यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. अभ्यासक्रमात शिथिलता आणा. मोठ्या संख्येने सीए तयार होऊ द्या. तरच देशाची प्रगती होणार आहे. 


जीएसटीचे रिटर्न अजूनही दाखल होत नाहीत

जीएसटीसारखा चांगला कायदा लागू होऊनही पाहिजे त्या प्रमाणात परतावा भरला जात नाही. पूर्वीच्या सरकारच्या काळात ३८ टक्के कर होते, जीएसटीमध्ये शून्य ते २८ टक्क्यांवर तो आणला आहे, असे ते म्हणाले. 


निर्लेपच्या विक्रीचा जीएसटी, नोटबंदीशी संबंध नाही

पत्रकारांशी बोलताना शुक्ला म्हणाले की, जीएसटी, नोटबंदी आणि निर्लेप कंपनी विक्रीचा अजिबात संबंध नाही. उलट नोटबंदी आणि जीएसटीमुळे घरात दडलेला पैसा बाहेर आला आहे. 


या वेळी मंचावर सीए संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, राज्य संघटनेचे सदस्य उमेश राठी, अनिल भंडारी, औरंगाबाद संघटनेचे अध्यक्ष सचिन लाठी आदींची उपस्थिती होती. तर कार्यक्रमास महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, मासिआ उद्योग संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी उपस्थित होते. ईशानसिंग व दीप्ती गढीया यांनी सूत्रसंचालन केले. योगेश अग्रवाल यांनी आभार मानले. 


आयएएस अधिकाऱ्यांना का घाबरता? 
या कार्यक्रमास जीएसटी, आयकर विभागासह उच्चपदस्थ राजपत्रित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांना लक्ष्य करत शुक्ला सीएंना उद्देशून म्हणाले की, तुम्ही आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांपेक्षा हुशार अाहात. त्यांना का घाबरता? सरकारला रिपोर्ट दिला तर त्याची दखल घेतली जाईल. आयएएस अधिकाऱ्यांना वाटते की, मी सर्व विषयांचा मास्टर आहे. पण तुम्ही दिलेला अहवाल चुकीचा नाही हे त्यांना पटवून देण्याचे धैर्य दाखवा. कारण तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते त्यांच्याकडे नाही हे लक्षात ठेवा. 

बातम्या आणखी आहेत...