आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने 50 यंत्रे खरेदी करून काम करावे, नंतर आम्ही तेवढीच यंत्रे देऊ: राम भोगले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनपाकडून अनेक प्रकल्प राबवण्यात येत असले तरी त्यात त्यांना यश आले नाही. शहरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योजकांनी सीएसआर (कंपनी दायित्व निधी) फंडातून मदत करावी, अशी मागणी मनपाने केली आहे. मात्र, मनपाने आधी ५० यंत्र खरेदी करून कचरा निर्मूलन प्रयोग यशस्वी करावा. त्यानंतर आम्ही सीएसआरमधून ५० यंत्र देऊ, असे आश्वासन उद्योगपती राम भोगले यांनी दिले. 


शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी स.भु. महाविद्यालयात सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्था, संघटना, उद्योजकांची बैठक झाली. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर मनमोहन सिंग ओबेराय, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, नगरसेवक कीर्ती शिंदे, डॉ. भालचंद्र कानगो, डॉ. गफार कादरी, काशीनाथ कोकाटे, गौतम खरात, समीर राजूरकर, गौतम लांडगे, अहमद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलताना भोगले म्हणाले, ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर तत्काळ प्रक्रिया करणारे केंद्र मनपाने स्थापन करावे. 


पुण्यात सध्या २५०० मशीन लावल्या असून काही संस्था, संघटनांकडून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. पुण्याप्रमाणे औरंगाबादेतही काम केल्यास कचऱ्याची समस्या कायमची सुटू शकते. या वेळी अनेकांनी मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले. नगरसेविका शिंदे म्हणाल्या मनपाने नारेगावकऱ्यांची माफी मागावी, तसेच कचऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. ओबेरॉय म्हणाले, मनपाने १९९७ ला सत्यम प्रकल्प आणला. परंतु तो चालला नाही. कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही समस्या निर्माण झाली आहे. शकुंतला देसरडा म्हणाल्या, मी गेल्या २५ वर्षांपासून खत प्रकल्पाचे काम करत आहे. मनपाने सहकार्य केल्यास एका वॉर्डात स्वखर्चाने कंपोस्टिंग खत तयार करू. 


शहरासाठी नारेगावकरांच्या पाया पडलो
महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, नारेगावचा प्रश्न हाताळण्यात आम्ही अपयशी ठरलो. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी मनपा विविध उपाययोजना करत आहे. डीपी प्लॅनमध्येही कचराडेपोबाबत चार ठिकाणे निवडण्यात आली आहेत. नारेगावकरांची एकदा नव्हे, चार वेळा माफी मागितली. त्यांच्या पायाही पडल्याचे घोडेले यांनी सांगितले. 


अगोदर अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी कंपोस्टिंग करावे
समीर राजूरकर यांनी प्रश्न गंभीर होईपर्यंत प्रशासन काय करत होते, असा सवाल केला. लोकप्रतिनिधी, नेते, मनपा पदाधिकारी यांनी स्वत:च्या घरी कचऱ्याचे वर्गीकरण करावे. महापालिका अधिकाऱ्यांनीही घरातील कचरा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. आयुक्त, अधिकाऱ्यांच्या घरांपासून कचरा व्यवस्थापनाची सुरुवात करा. मशीन घेण्यापूर्वी अनुभव घ्यावा आणि नंतरच काम सुरू करावे. जनजागृती करण्यासाठी नागरिकांची मदत घ्यावी, असे पर्याय या वेळी सुचवण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...