आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांनी मनपाच्या पथकाला पिटाळले; मिटमिटा परिसरात तणावाचे वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी मिटमिट्यातील 'सफारी पार्क'वर आलेल्या मनपा, प्रदूषण नियंत्रण, तहसीलदार आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना रविवारी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अधिकाऱ्यांसोबत आलेल्या पोलिसांनी बंदूक काढल्याचा आरोप करत नागरिकांनी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मुळे पथकाला परत फिरावे लागले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. 


चार दिवसांपूर्वी मिटमिटा-जांभाळा परिसरातील नागरिकांनी विरोध केल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शनिवारी कांचनवाडी, गोलवाडीतही प्रचंड विरोध झाला. त्यानंतर रविवारी महसूल, महापालिकेचे अधिकारी मिटमिटा येथील सफारी पार्क परिसरात जागा पाहण्यासाठी आले. तहसीलदार रमेश मुनलोड, शशिकांत हदगल, मनपा सहआयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे शहरातील कचरा टाकण्यासाठी सफारी पार्कच्या जागेची पाहणी करत असल्याचे समजताच नागरिक जमा झाले. मिटमिटा कचरा डेपो विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, नागरिकांनी जोरदार विरोध करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. या वेळी अधिकाऱ्यांसोबत आलेल्या सुरक्षारक्षकाने बंदूक काढल्याचा आरोप नागरिकांनी केला. अधिकाऱ्यांच्या ताफ्यामागे कचऱ्याच्या गाड्या होत्या. कचऱ्याने भरलेले ट्रक येथे रिकामे करू दिले जाणार नाही, असे नागरिकांनी ठणकावून सांगितल्यानंतर पथक माघारी फिरले. 


विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
महापालिकेने शहरातील कचरा वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक ठिकाणी विरोध होत आहे. शासनाने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. त्यानुसार भापकर यांनी जागेची निवड करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, मनपा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक संयुक्त पथक स्थापन केेले होते. या पथकाने रविवारी मिटमिटा, कांचनवाडी, चिकलठाणा आणि गांधेली येथे पाहणी केली. यापैकी कांचनवाडी, मिटमिटा आणि चिकलठाणा येथील जागा मनपाच्या मालकीच्या आहेत. तर गांधेेली येथे शासनाची गायरान जमीन आहे. 


आज अज्ञात स्थळी टाकणार कचरा 
मनपाच्या वतीने जागांची पाहणी करण्यात आली असून ज्या ठिकाणी विरोध झाला, ते सोडून इतर ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता सोमवारी अज्ञात स्थळी कचरा नेऊन टाकण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...