आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर, सभापती म्हणाले- विशेषाधिकारात 5 प्रक्रिया यंत्रे खरेदी करा; आयुक्त म्हणाले: निविदाच काढतो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमातील कलम ६७ (३) (क) मध्ये आयुक्त तातडीने कोणत्याही सभागृहाच्या परवानगीशिवाय खरेदी करू शकतात. याच कलमाचा वापर करून आयुक्त दीपक मुगळीकर यांनी कचरा विल्हेवाट लावणाऱ्या पाच यंत्रांची खरेदी करावी, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी केली. परंतु या अधिकाराचा वापर करण्यास मुगळीकर यांनी स्पष्ट नकार दिला. निविदा काढूनच यंत्र खरेदी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तेव्हा निकड लक्षात घेता तुम्ही स्थायी समितीसमोर प्रस्ताव द्या. ५ (२)(२) कलमान्वये मी परवानगी देतो, असे सभापतींनी सांगितले. परंतु मुगळीकर यांनी त्यांनाही जुमानले नाही. 


तलवारीने भाजी कापत आहात 
प्रत्येक वाॅर्डात खतनिर्मिती करून कचरा जिरवावा, अशी सूचना प्रा. देसरडा यांनी केली. आधीपासूनच तयारी केली असती तर आज ही वेळ आली नसती. आता तुम्ही तलवारीने भाजी कापत आहात. विकेंद्रीकरण करून प्रकल्प सुरू करावेत, असे सांगतानाच त्यांनी आयुक्तांना झापले. आम्हाला अधिकार नाहीत, तुम्हाला अधिकार आहेत आणि तुम्ही त्यांचा वापर करत नसल्याचे ते म्हणाले. 


१९ व्या दिवशी तीच चर्चा हे अपयश 
१९ दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा केली होती. आजही तोच विषय आहे आणि त्यातून मार्ग निघू शकलेला नाही. हे प्रशासनाचे मोठे अपयश असल्याची टीका घोसाळकर यांनी केली. 


पाय धरा, नारेगाव हाच एकमेव पर्याय 
प्रकल्प सुरू होईपर्यंत कचरा कोठे टाकायचा याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. सर्वांनी नारेगावकरांचे पाय धरावेत आणि प्रकल्प सुरू होईपर्यंत तेथे कचरा टाकू देण्याची विनंती करावी, अशी सूचना सारंग टाकळकर यांनी केली. 


आयुक्त निर्णय घेत नसल्यामुळे नाराजी 
आणीबाणीच्या स्थितीत महापौर, स्थायी समितीचे सभापती निर्णय घेतात. परंतु ज्यांना अधिकार आहेत तेच आयुक्त निर्णय घेत नसल्याबद्दल घोसाळकरांपासून तनवाणी, जैस्वाल यांच्यासह सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. दुसरे आयुक्त असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते, अशीही भावना काहींनी व्यक्त केली. 


दिव्य मराठीचे आवाहन 
सध्या शहरात शंभरपेक्षा अधिक रसवंत्या सुरू आहेत. त्यातून निघणारी उसाची चिपाडे रसवंतीचालक नजीकच्या कचराकुंडीत टाकत आहेत. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे वाढत चालले आहेत. महापालिकेचे प्रशासनही त्यांना रोखत नाही. वस्तुत: ही चिपाडे मोठ्या कारखान्यांना जळण म्हणून उपयुक्त आहेत. म्हणून रसवंतीचालकांनी ती कुंड्यांमध्ये न टाकता स्वत:कडेच साठवून ठेवावीत, असे आवाहन 'दिव्य मराठी'तर्फे करण्यात येत आहे. 


कचराकोंडीवर आज विशेष सभा 
कचराकोंडीवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी मनपाची विशेष सभा होईल.या सभेत नवीन प्रकल्पाच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...