आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू तस्करांनी जागोजागी केले ट्रॅक्टर मावेल एवढे खड्डे, त्यामुळे ५ वर्षांपासून भरत नाही हर्सूल तलाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ३६२ एकर परिसरात विस्तारलेल्या हर्सूल तलावाची वाळू तस्करांच्या अधाशीपणामुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. वाळू उपशासाठी जटवाड्यापासून ते तलावापर्यंतच्या दोन किलोमीटर अंतरात नदीपात्रात अख्खे ट्रॅक्टर मावेल, एवढे मोठे खड्डे ठिकठिकाणी केले आहेत. या परिसरातून दररोज किमान १०० ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा होत असताना महापालिका, महसूल विभाग आणि पोलिस या वाळू तस्करीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नदी प्रवाह खंडित झाला. परिणामी पाऊस पडूनही गेल्या पाच वर्षांत हर्सूल तलाव पूर्ण क्षमतेने भरलाच नाही. शहरात पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वर्षानुवर्षे जुन्या शहराची तहान भागवणारा हा ६.६७ घन मिलिमीटर (एमएमक्यूब) साठवण क्षमतेचा जलस्रोत मृत झाला आहे. 


जटवाड्याच्या डोंगरातून ओढ्यामार्गे येणारे पाणी या तलावाचा प्रमुख स्रोत आहे. १९५४ पासून या प्रवाहाच्या पाण्याने हा तलाव भरतो. मात्र, मागील दहा वर्षांत या ओढ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू, मुरूम चोरी सुरब झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्कर याच ठिकाणी मातीमिश्रित वाळू धुतात, ती ट्रॅक्टरमध्ये टाकून विक्रीसाठी नेतात. वाळू तस्करांचा हा उद्योग दिवसभर सुरू असतो. तरीही तिकडे कोणत्याही विभागाचा अधिकारी फिरकतही नाही. हर्सूल तलाव महापालिकेच्या मालकीचा असल्याचे सांगूून महसूल विभागाचे अधिकारी पद्धतशीर कानाडोळा करतात, तर खनिज उत्खनन हा विषय अखत्यारित नसल्याचे सांगून महापालिका हात झटकते. 


जटवाडा डोंगरातून निघालेला ओढा पोखरल्याने प्रवाह खंडित 
जमिनीखाली वाळू आहे का हे पाहण्यासाठी वाळू चोर जेसीबीने आधी छोटा खड्डा करून पाहतात. त्या ठिकाणी वाळू असल्याचे लक्षात येताच जेसीबी लावून माती काढण्यास सुरुवात होते. आणि नंतर अख्खे ट्रॅक्टर मावेल एवढे मोठे खड्डे करून बेसुमार वाळू उपसा सुरू होतो. जटवाड्याच्या डोंगरातून निघालेला ओढा वाळू तस्करांनी मोठमोठे खड्डे करून पोखरल्यामुळे हर्सूल तलावात येणारा पाण्याचा प्रवाहच खंडित झाला. परिणामी ओढ्याचे पाणी तलावापर्यंत पोहोचतच नसल्यामुळे तलाव भरत नाही. 


वाळू उपशामुळे भूकंपाचा धोका 
भूगोलतज्ज्ञांच्या मते, बेसुमार वाळू उपशामुळे खडक उघडे पडतात आणि भूकंपाची शक्यताही वाढते. मातीचा एक थर तयार होण्यासाठी एक हजार वर्षे लागतात. वाळूचेही तसेच आहे. पात्रातील खडक झिजून त्याचे गोटे तयार होतात. त्याचे घर्षण होऊन वाळू तयार होते. या सर्व प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. वाळू तस्करांनी खोदलेले खड्डे पुढील २५ वर्षे तरी भरणार नाहीत. वाळू उपशामुळे पाणी थांबत नाही. त्यामुळे परिसराचे पर्यावरणच धोक्यात आले असून त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. 


लाखोंच्या 'बक्षिसी'मुळे महसूल, पोलिस, मनपाकडून डोळेझाक 
पावसाळा वगळता ८ महिने या भागातून कायम वाळू, मुरमाची तस्करी होते. हर्सूल तलावातून वाळू उपशावर महसूल विभागाची बंदी असूनही वाळू तस्कर मनपा, महसूल व पोलिसांच्या डोळ्यादेखत वाळू-मुरूम तस्करी करतात. स्थानिक नागरिकांच्या मते, जेसीबी, पोकलेन, टिप्पर व ट्रॅक्टरच्या हिशेबाने वाळू तस्कर अधिकाऱ्यांना हप्ते देतात. एका ट्रॅक्टरसाठी पोलिसांना किमान दोन हजार रुपये 'बक्षिसी' जाते. महसूल अधिकाऱ्यांची 'बक्षिसी' लाखोंच्या घरात जाते. नागरिकांनी विरोध केला तर त्यांना दमदाटी केली जाते. 


४०० वर्षे जुन्या नहरीलाही मोठी भगदाडे 
जटवाड्याच्या डोंगरातून ज्यामार्गे तलावात पाणी जमा होते त्याच ओढ्यात ४०० वर्षे जुनी नहर आहे. मात्र, वाळू आणि मुरूम चोरांच्या वाहतुकीमुळे नहरीलाही मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लिटर पाणी या भगदाडातून वाहून जाते. स्थानिक नागरिकांनी ही बाब मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या अनेकदा लक्षात आणून दिली, परंतु अजूनही नहरीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. 


मॉर्निंग वॉकचे निमित्त करून केली पाहणी 
पहाटेपासूनच वाळू चोरी करण्यास सुरुवात होते. या भागात कोणीही नवीन माणूस दिसल्यास त्यांना का आलात, असे विचारून पाठलाग केला जातो. कोणीही सरकारी अधिकारी तळ्याजवळ जरी दिसले तर काही मिनिटांत ही माहिती वाळू तस्करांना मिळते आणि काम थांबवून कामगार पसार होतात. 'दिव्य मराठी' टीमने मॉर्निंग वॉकचे निमित्त करून हा परिसर पाहिला. माहिती आणि छायाचित्रे मिळवली. टीम शहरात येईपर्यंत पाठलाग सुरू होता. 


तलाव उशाशी असून १४ वॉर्ड टँकरवर 
हर्सूल तलावातून जुन्या शहरातील १४ वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. यासाठी जटवाडा रोडवर महापालिकने स्वतंत्र फिल्टर उभारले. मात्र, पावसाळ्यानंतर तीन-चारच महिने तलावाचे पाणी पुरते. त्यामुळे तलाव असूनही या भागातील लोकांना आठ महिने टँकरवर विसंबून राहावे लागते. मनपाला पाणीपट्टी भरूनही या त्रासामुळे या भागातील नागरिक संतप्त आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...