आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सयाजीराव गायकवाड यांचे साहित्य लवकरच खंडरुपात; साहित्य संमेलनात हाेणार प्रकाशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 औरंगाबाद- सयाजीराव गायकवाड चरित्र साधने आणि प्रकाशन समितीने सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याच्या बारा खंडांचे काम पूर्ण केले आहे. हे खंड राज्य शासनातर्फे प्रकाशित होत आहेत. १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणाऱ्या  ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याचे प्रकाशन होईल. एकूण २५ खंड प्रकाशित करण्यात येणार असून बडोद्यातील सोहळ्यात १२ खंड प्रकाशित करण्यात येतील, अशी माहिती समितीचे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष   बाबा भांड यांनी सोमवारी दिली. सरकारच्या मान्यतेनंतर खंडांची संख्या दोन वर्षांत ५० पर्यंत नेण्याचा विचार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.    


भांड म्हणाले, हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील बारा ग्रंथांची निर्मिती पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनात १२ खंडांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने सयाजीराजे गायकवाड यांची प्रशासन पद्धती, त्यांची नीती, तळागाळातील समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य वाचकांसमोर येणार आहे.


सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने ‘समग्र महाराजा सयाजीराव’ हा प्रकल्प गतवर्षी हाती घेतला होता. त्यासाठी राज्य सरकारने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. या बारा खंडांपैकी ‘गौरवगाथा युगपुरुषाची’ हा सयाजीराजे यांच्या कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ मी संपादित केला आहे. दरम्यान सयाजीरावांवर येत असलेल्या या खंडांमुळे साहित्यिक आणि वाचकांना नवी भेट मिळणार आहे.

 

पत्रांचे सात खंड
डॉ. रमेश वरखंडे यांनी सयाजीराजेंच्या मराठी भाषणांचे दोन खंड संपादित केले आहेत. डॉ. अविनाश सप्रे यांनी इंग्रजीचे खंड संपादित केले आहेत. सयाजीराजे यांचा पत्रव्यवहार दांडगा होता. त्यांनी विविध विषयांवर हजारो पत्रे लिहिली आहेत. या मराठी आणि इंग्रजी पत्रव्यवहाराचे एकूण सात खंड तयार करण्यात आले असून डॉ. एकनाथ पगार यांनी खंडांचे संपादन केले आहे, असेही भांड यांनी सांगितले.   

 

 

अशी आहेत खंडांची नावे
सयाजीराव गायकवाड भाषणसंग्रह -दोन खंड, संपादक -डॉ.रमेश वरखेडे, पत्रसंग्रह -तीन खंड, संपादक- एकनाथ पगार, इंग्रजी भाषणे -दोन खंड, संपादक -प्रा. अविनाश सप्रे, सयाजीराव गायकवाड इंग्रजी पत्रव्यवहार- चार खंड, संपादक -डॉ. एकनाथ पगार आणि गौरवगाथा युगपुरुषाची : गौरवग्रंथ- एक खंड, संपादक -बाबा भांड.

बातम्या आणखी आहेत...