आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार; बेशिस्त पार्किंगमुळे गेले प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत लहानू घुगे - Divya Marathi
मृत लहानू घुगे

औरंगाबाद- स्कूल बसचा धक्का लागून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी समर्थनगरात घडली. लहानू त्र्यंबक घुगे (५३ रा. पिसादेवी रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते सातारा परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत लिपिकपदी कार्यरत होते. रस्त्यावरच बेपर्वाईने लावलेल्या वाहनांमुळे हा अपघात घडला असून क्रांती चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर नाथ व्हॅली स्कूलच्या बसचा चालक स्वत:हून ठाण्यात हजर झाला. पुंडलिक रामचंद्र नरवडे असे या चालकाचे नाव आहे. 


घुगे हे समर्थनगरमार्गे घरी जात असताना वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या अलीकडे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. सतीश मोटार्सजवळ विद्यार्थ्यांना सोडून स्कूल बस (एमएच २० एए २२८८) औरंगपुऱ्याच्या दिशेने जात होती. घुगे त्याच रस्त्याने दुचाकीवरून (एम एच २० डीएच ३००) जात होते. रस्त्याच्या बाजूलाच अनेक वाहने लावलेली असल्याने बस दुचाकीच्या अगदी जवळून जात होती. दुचाकीचे हँडल बसच्या मध्यभागी लागले अाणि घुगे थेट रस्त्यावर कोसळले. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यांचे हेल्मेट तुटून पडले आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच वेळी रस्त्याने जाणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी गौतम अंभोरे यांनी आकाश आरगडे आणि अक्षय शेळके यांच्या मदतीने घुगे यांना तत्काळ घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी आणि उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 


मुलगी गाडीवरून पडली म्हणून तिला भेटून परतत होते : घुगे यांना दोन मुली आणि मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी सोमवारी सकाळी कामाला जाताना दुचाकीवरून पडली होती. शाळा सुटल्यानंतर ते तिला चिकलठाणा येथील एमआयडीसीत भेटले. त्यानंतर समर्थनगरमार्गे ते हर्सूल येथे परतत होते. घटनेची माहिती मिळताच मुलगा राहुल आणि मुलगी सविता घाटीत धावले होते. त्यांच्या पत्नी कामानिमित्त चाळीसगाव येथे निघाल्या होत्या. राहुल हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर मुलगी नोकरी करत असल्याचे नातलगांनी सांगितले. 


मारहाणीच्या भीतीने चालक ठाण्यात

दुचाकीस्वार घुगे गतप्राण झाल्याचे पाहून बस अपघातस्थळी सोडून अपघातानंतर बस चालक पुंडलिक नरवडे याने थेट क्रांती चौक ठाणे गाठले. हातून अपघात झाल्याची कबुली दिली. जमाव मारहाण करेल, म्हणून आपणहून ठाण्यात आल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी नरवडे यास ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक काचमांडे हे करीत आहेत. 


हेल्मेट होते, पट्टा लावला नसावा 
घुगे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत नसत, असे नातलगांनी सांगितले. ते रस्त्यावर कोसळले त्या वेळी हेल्मेट जवळच पडले होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यांनी हेल्मेटचा पट्टा लावला नसावा. त्यामुळे हेल्मेट निघाले. घटनास्थळाजवळील उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या सीसीटीव्हीत अपघात कसा झाला, हे चित्रित झाले असावे. मात्र, पोलिसांनी पत्र देऊनही बँकेने संध्याकाळपर्यंत फुटेज दिले नाही. 


रस्त्याजवळच लावलेल्या वाहनांमुळे अपघात
समर्थनगर रस्त्यावरील हॉटेल अगदी रस्त्यापर्यंत आले आहेत. हॉटेल आणि क्लासेसला येणारे अनेकजण दुचाकी सर्रास रस्त्यावर लावतात. त्यामुळे रहदारीसाठी अतिशय कमी रस्ता राहतो. परिणामी गाड्या अगदी एकमेकांचा चिकटून चालतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्तेदेखील धोकादायक बनले आहेत. 


रक्तस्रावामुळे मृत्यू 
घुगे रस्त्यावर पडताच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार ते किमान दहा मिनिटे रस्त्यावर पडून होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्त वाहून गेले. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. 

बातम्या आणखी आहेत...