आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरातील भंगारचे गोडाऊन आगीत खाक, लाखोंची हानी; 8 तासानंतर आग आटोक्‍यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथील भंगाराचे गोडाऊन शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. एमआयडीसीच्या दोन आणि औरंगाबाद महानगरपालिकेचा एक अशा तीन अग्निशमन बंबांच्या मदतीने तब्बल आठ तासांत आग नियंत्रणात आणण्यात आली. आग कोणीतरी मुद्दाम लावल्याचा संशय गोडाऊनचे मालक अभिजित राजेंद्र पाटणी (रा. बीड बायपास ) यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भंगार व्यावसायिक पाटणी यांनी पंढरपूर परिसरातील फुलेनगरलगतच्या सी-२८२ सेक्टरमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या १० हजार स्क्वेअर फूटपैकी तीन हजार स्क्वेअर फूट जागेत गोडावून उभारले होते. या गोडावूनमध्ये आणि समोरील सात हजार स्क्वेअर फूटच्या मोकळ्या जागेत सर्व प्रकारच्या काचेच्या बाटल्या, त्यांचे झाकणं आणि इतर प्लास्टिक भंगार साहित्य ठेवण्यात आले होते. घटनेच्या आदल्या दिवशी गुरुवारी गोडावूनमध्ये काम करणारे सर्व १० कामगार रात्री गोडाऊन बंद करून घरी निघून गेले होते. सकाळी साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास गोडाऊनमधून धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. तेव्हा घाबरून त्यांनी आरडाओरड सुरू केली. एक सजग नागरिक रवींद्र दाभाडे यांनी तत्काळ लगतच्या एमआयडीसी अग्निशमनच्या कार्यालयात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यावरून एक अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांनी दोन बंबांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत गोडाऊनचे शटर तोडून पाण्याचा मारा सुरू केला. त्यानंतर काही वेळाने एमआयडीसी पोलिसांसह मनपाचा १ अग्निशमन बंब घटनास्थळी आले. ८ तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणल्याची माहिती एमआयडीसीच्या अग्निशमन दलाकडून मिळाली. यासंदर्भात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेच्या चौकशीनंतर आग लागली की, लावली हे समोर येणार असल्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.

 

सुरक्षा साधनांअभावी अग्निशमन जवानांच्या हातात घुसले काचेचे तुकडे
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडे सेफ्टी शूज, ग्लोव्हज, मास्क, कॅप व इतर सुरक्षा साधनांचा अभाव होता. यामुळे जवानांच्या जिवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एमआयडीसी प्रशासनाच्या जवानांकडेही ग्लोव्हज नव्हते. आग आटोक्यात आणताना अनेकांच्या हातामध्ये बारीक-बारीक काचेचे तुकडे घुसल्यामुळे त्यांना काम करणे कठीण जात असल्याचे 'दिव्य मराठी'च्या निदर्शनास आले.

बातम्या आणखी आहेत...