आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन केंद्रांवर प्रश्नपत्रिका 10 मिनिटे उशिरा आल्या; ढिसाळ नियोजनाचा विद्यार्थ्यांना मनस्ताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बोर्डाच्या ढिसाळ नियोजनामुळे मंगळवारी दहावीच्या संस्कृत आणि बारावीच्या पुस्तपालन व लेखाकर्म, जीवशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर दहा मिनिटे उशिरा पोहोचल्या. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. 


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी, तर १ मार्चपासून दहावीच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या स्टिकरचे गठ्ठे रस्त्यावर पडणे, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जळणे, भरारी व बैठ्या पथकांचा अभाव अशा प्रकारामुळे यंदा बोर्डाचे परीक्षेचे कामकाज कोलमडले आहे. बीड जिल्ह्यात उत्तरपत्रिका जळाल्याची घटना ताजी असताना अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा फटका मंगळवारी केंद्रप्रमुख आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. दहावीचा संस्कृत, तर बारावीचा पुस्तपालन व लेखाकर्म, जीवशास्त्र या विषयांचा पेपर होता. या पेपरच्या प्रश्नपत्रिका नियमानुसार १०.४५ वाजेपर्यंत कस्टोडियनकडून परीक्षा केंद्रावर आणि १०.५० वाजता विद्यार्थ्यांना वितरित होणे अपेक्षित आहे. मात्र, धर्मवीर संभाजी विद्यालय परीक्षा केंद्रावर सात मिनिटे आणि जिजामाता विद्यालयात दहा मिनिटे उशिरा पोहोचल्या. अकराची घंटा वाजली, पण प्रश्नपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले. शिक्षकांनी फोन केल्यानंतर कस्टोडियनकडे प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यानंतर तत्काळ बोर्डातून प्रश्नपत्रिका मागवण्यात आल्या. तोपर्यंत परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, शिक्षकांची धावपळ उडाली. 
 


वेळ वाढवून दिला 
दोन परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या नसल्याची माहिती मिळाली होती. काही जणांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला. असे प्रकार घडू नयेत म्हणून कस्टोडियनला ताकीद दिली आहे. 
- सुगता पुन्ने, विभागीय सचिव, एसएससी बोर्ड 

बातम्या आणखी आहेत...