आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी, मोबाइल-इंटरनेटमुळे मंदावली ‘ढोलकीची थाप’ ; खेडकर यांनी व्यक्त केली खंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - लोककलेच्या माध्यमातून तमाशा ही कला सातासमुद्रापार नेणाऱ्या रघुवीर खेडकर यांना नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ मिळाला. चार दशकांहून अधिक काळापासून ते तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत. आई कांताबाई सातारकरांपासून त्यांना तमाशाचे बाळकडू मिळाले. सध्या ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष आहेत. एक उत्तम कलाकार व सोंगाड्या म्हणून ते परिचित आहेत. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रसंगी तमाशा सादर करण्याचा मान त्यांना मिळाला होता.  एक प्रयोगशील तमाशा फड मालक आणि कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. घोडेगाव (जि. नगर)येथील यात्रेत त्यांची भेट झाली.  त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दांत.... 

 

“पुरस्कार हा कलेला मिळालाय. आयुष्याबाबत म्हणाल तर खूप काही राहिले आहे. तमाशा कलाकार जेव्हा येथून निवृत्ती घेऊन गावी जातो तेव्हा त्याला माणूस म्हणून वागणूक मिळत नाही. निवृत्त तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम काढण्याची इच्छा आहे. त्याची सुरुवात नेमकी कशी करायची हे मात्र अजून ठरवलेले नाही.  


मुळात तमाशा हेच मुळी आव्हान ठरते. इंटरनेट, टीव्ही, मोबाइलमुळे तमाशाची अवस्था बिकट झाली आहे. एखाद्या कार्यक्रमात तरुण मुलगा कार्यक्रमाचे मोबाइलवर रेकॉर्डिंग करतो आणि लगेच यू-ट्यूब किंवा इतरत्र व्हायरल करतो. तमाशा पाहण्यासाठी तीन-चार तास वेळ देणारे रसिक आता राहिले नाहीत. जे पाहायचे ते एका क्लिकवर मिळत असल्याने तमाशाची स्थिती बिकट झाली आहे. त्यातच नोटबंदीमुळे कनातीच्या कार्यक्रमांचा प्रेक्षक ५० टक्क्यांनी कमी झाला. कधी नव्हे एवढा बिकट प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून उभा राहिला आहे.   


खर्चाचा मेळ अवघड 
गेल्या पाच-सहा वर्षांपासून फक्त खर्चाचा मेळ बसतो. जमा काहीच राहत नाही. मुळात १२ महिन्यांतून फक्त सात-आठ महिनेच काम असते. त्यातही जत्रा-यात्रांच्या काळात थोडेफार बरे मानधन मिळते. माझ्याकडे स्टेजवरचे ६० कलाकार आणि इतर ५० अशी ११० माणसे आहेत. त्यांचा रोजचा खर्च आणि प्रवासाचा हिशेब केला तर ५० ते ७० हजार रुपये लागतात. सामान्य कलाकारांना ५०० ते १२०० रुपये हजेरी द्यावी लागते. सुपाऱ्या ५० हजारांपासून दीड लाखांपर्यंत असतात. हे सगळे पाहता जमाखर्चाचा मेळ बसणे शक्यच नसते.   


गेले ते दिवस
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ४० हून अधिक लहान-मोठे तमाशा मंडळे होती. पुण्यात २६ तर नगरला पाचहून अधिक टॉकीज होत्या. तेथे कार्यक्रम करता यायचे. आता ती स्थिती राहिली नाही. सध्या मंगला बनसोडे, अंजली नाशिककर, भिका-भीमा सांगवीकर, शांताबाई संक्रापूरकर, कुंदा पाटील, पांडुरंग मुळे, आनंद लोकनाट्य, काळू-बाळू, मालती इनामदार अशी फक्त आठ-नऊ तमाशा मंडळे आहेत. तमाशा करिअर म्हणून निवडणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे इकडे येण्यास नवीन कलाकार तयार नसतात. पूर्वी भटक्या समाजातील मुले-मुली तमाशाकडे वळत. कलाकारांची कमी नव्हती. आताही भटक्या समाजातील कलाकारच काही प्रमाणात आहेत. सरकारची अनास्था, चांगल्या रसिकांची कमतरता आणि सोशल मीडिया, टीव्हीचा अतिवापर आदी कारणांमुळे तमाशाला चांगले दिवस राहिले नाहीत.   


...तर ही कला जिवंत राहील 
खरं पाहिलं तर तमाशाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. कलाकारांना मानधन, पेन्शन, तमाशा फडांना अनुदान असे काही चांगले निर्णय झाले, मात्र त्यात सातत्य नाही. सुशीलकुमार शिंदे आणि कै. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात तमाशा फडासाठी सहा लाख अनुदान आणि दोन लाख भागभांडवल दिले गेले. मात्र त्यानंतर हे अनुदान दोन आणि आता थेट तीन वर्षांनंतर दिले जाते. 


अशोकराव चव्हाणांनीही काही प्रमाणात तमाशासाठी चांगले निर्णय घेतले. पण तमाशा कलावंतांसाठी पुढे कुणीही गांभीर्याने निर्णय घेतले नाहीत. नवीन तमाशा उभा करायचा म्हणजे ५० लाख रुपये लागतात. त्या प्रमाणात सरकारी मदतीची अपेक्षा आहे. रसिकांनी याकडे फक्त कला म्हणून पाहावे. सर्वांच्या प्रयत्नांनीच ही कला जिवंत राहू शकते.    


सर्कस, तमाशाला राजाश्रय मिळावा  सर्कस आणि तमाशा या कलांचे सध्याचे दिवस पाहता येत्या काही दिवसांतच त्या नामशेष होण्याची भीती आहे. 


भारताबाहेर मात्र सर्कस आणि स्थानिक लोककलांना राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्हीही मिळते. तमाशा ही महाराष्ट्राची ही लोकधारा जिवंत राहण्यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यायला हवे. लोकांनीही तमाशाकडे फक्त कला म्हणून पाहावे.”  

 

मुलींच्या शिक्षणाला प्राधान्यच...  
रघुवीर यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी सीए तर दुसरी सिव्हिल इंजिनिअर आहे. त्यांच्या फडातही बीए, बीएस्सी झालेले अनेक कलाकार आहेत. मागासवर्गीय किंवा भटक्या समाजातील कलाकार तमाशाकडे चरितार्थाचे साधन म्हणून वळत असले तरी या कलेतही शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. कलाकार वर्षातील आठ महिने फिरतीवर असतात. मात्र अनेक कलाकारांची मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाला नेहमी प्राधान्यच दिले जाते.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...