आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून हिमालयाच्या कुशीत, राज्यातील पेरण्या धोक्यात; गतवर्षीच्या तुलनेत ५०% क्षेत्रावर पेरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्रात कोकण वगळता इतर भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाअभावी हा पेरा धोक्यात आला आहे. राज्यात शनिवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.  


राज्यात ८ जून रोजी नैऋत्य मान्सून दाखल झाला. मृग आणि आर्द्रा नक्षत्राच्या पूर्व चरणात झालेल्या पावसावर काही भागात पेरणी झाली. जूनअखेेर गतवर्षी २५.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, यंदा ती १२.०४ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर पेरा झाला आहे. कोल्हापूर  विभागात सर्वाधिक १५ टक्के पेरणी झाली आहे.  


मार्च-एप्रिलमधील मंद वाऱ्यांमुळे मान्सूनमध्ये खंड
मार्च-एप्रिलमधील वाऱ्यांच्या मंद वेगामुळे  यंदा मान्सूनमध्ये मोठे खंड पडणार आहेत. जूनमध्ये याचा अनुभव आपण घेतला. साधारणपणे मार्च एप्रिलमध्ये ताशी ८ ते १० किलोमीटर वेगाने वारे वाहतात, यंदा वाऱ्याचा वेग २ ते ३ किलोमीटर होता. याचा परिणाम नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर झाला आहे. महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्येही काही प्रमाणात खंड पडतील. खरिपाच्या दृष्टीने जुलै महिना महत्त्वाचा अाहे. मागील दोन वर्षांपासून जुलैमध्ये पावसात खंड पडत आहे.  परिणामी खरिपातील उत्पादन घटते आहे.  राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ञ


पेरणी संकटात
कृषी विभागानुसार राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची एकूण ९ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने ही पेरणी संकटात आहे. दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास हा पेरा वाया जाण्याची शक्यता आहे. यात कडधान्याला सर्वाधिक फटका बसून कडधान्याचे क्षेत्र २० ते २५ टक्के घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


- ६ जुलैपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात. बंगालच्या उपसागरात वायव्येला चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण होत आहे.
- सध्या हिमालयाच्या पायथ्याशी असणारा मान्सूनचा आस (ट्रफ) त्यामुळे पुन्हा दक्षिणेकडे सरकण्यास मदत होईल.
- ७ जुलैपासून मान्सून चांगला सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य भारत, महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशात चांगला पाऊस होईल.

 

बातम्या आणखी आहेत...