आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्याचा मला 'भानगड वाढवू नको' म्हणून फोन, निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटकेंचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कुळ जमीन विक्रीसाठीची परवानगी देताना गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली निलंबित झालेले उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार आणि १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिल्यानंतर शनिवारी आणखी एक खळबळजनक दावा केला.

 

या प्रकरणाची भानगड जास्त वाढवू नका, असे सांगणारा फोन दुसऱ्या जिल्ह्यातील एका मंत्र्याने मला केला होता, असे कटके यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, तो मंत्री कोण हे सांगण्याचे त्यांनी टाळले. दरम्यान, रात्री उशिरा माझे मनोगत असे दोन पानी पत्र कटकेंनी प्रसारमाध्यमांना पाठवले. त्यात माझ्या पाठीशी मोठी संघटना नसल्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी डॉ. भापकरांचे नाव न घेता म्हटले आहे.

 

१० जानेवारी रोजी कटकेंनी सिटी चौक पोलिस ठाण्यात डॉ. भापकरांविरुद्ध अॅट्रॉसिटी व १ कोटी रुपये मागितल्याची तक्रार दाखल केली आणि ११ जानेवारी रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी पोलिसांना सहकार्य करत आहे. मात्र, मी दिलेल्या तक्रारींवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही मी तक्रार दिली आहे, परंतु त्यावरही कारवाई झालेली नाही. जीविताला धोका असल्याने मी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. याविषयी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. कटकेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासंबंधी पोलिस कायदेविषयक सल्ला घेत असल्याने याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेणार असल्याचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले.

 

बेछूट आरोप म्हणून हिणवले : मनोगत पत्रात कटके यांनी म्हटले आहे की, प्रशासकीयच नव्हे तर सामाजिक उतरंडीत माझे मोठे बंधू (डॉ. भापकर) उच्च श्रेणीत असून मी अ.जा. प्रवर्गातील खालच्या श्रेणीचा अधिकारी आहे. तरीही त्यांनी माझ्या कायदेशीर भूमिकेस बेछूट आरोप म्हणून हिणवले. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांनी भाष्य करणे उचित नाही. महसूल परिवारातील एका ज्येष्ठ बंधूने माझ्यावरील कारवाईस लोकहितास्तव शासनाची कार्योत्तर मान्यता घेता येईल, अशी प्रतिक्रिया देऊन एक प्रकारे अन्यायाला समर्थनच दिले आहे. जी चूक मी केलीच नाही ती केल्याचा बनाव करण्याकरिता आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपले ज्येष्ठपण किती पोकळ आहे, हे दाखवून दिले, असेही कटकेंनी पत्रात म्हटले आहे.

 

भापकरांची नार्को करा
कटकेंना हेतुत: निलंंबित करणारे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांची नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी चर्मकार उठाव संघाचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली. कटकेंना शासनाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाला आहे. भापकरांनी द्वेषभावनेतून ही कारवाई केली, असे सांगत भापकरांच्या संपत्तीची ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशीही मागणी त्यांनी केली.

 

बातम्या आणखी आहेत...