आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीच्या दिवशी स्वत:हून दखल घेत न्यायालयाने दिले गर्भपाताचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद -शारीरिक व्यंगासह वाढत असलेल्या २२ आठवडे व ६ दिवसांच्या भ्रुणाचा त्वरित गर्भपात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली. उन्हाळी सुटी असतानाही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्या. मंगेश पाटील यांनी स्वत:हून दखल घेत या प्रकरणाची सुनावणी केली आणि हा निकाल दिला. त्यामुळे जालन्याच्या संगीता बंडू हिवाळे नामक महिलेला दिलासा मिळाला आहे.


संगीता ही घरगुती कामे करून उदरनिर्वाह करते. तिने जालन्यातील आेम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये तपासणी केली असता गर्भात वाढणाऱ्या बाळाचा मेंदू कवटीबाहेर येत असल्याचे तसेच तिच्या दोन्ही किडणींवर रक्त साचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवाय, गर्भात वाढणाऱ्या बाळास मोठ्या प्रमाणावर शारीरिक व्यंग असून गर्भपात करणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले. त्यानंतर तिने औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयात तपासणी केली. तेव्हा येथील डॉक्टरांनीही तेच निरीक्षण नोंदवत तिला ताबडतोब गर्भपाताचा सल्ला दिला. मात्र, कायद्यानुसार, २० आठवड्यांपेक्षा जास्त काळाचा गर्भपात करता येत नाही. त्यासाठी परवानगी घेण्यासाठी संगीताने मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील यांनी उन्हाळ्याची सुटी असताना २१ मे रोजी प्रकरण स्वत:हून चालविले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय बोर्डाच्या अहवालाप्रमाणे त्वरीत गर्भपात करण्याचे आदेश दिले.  संगीताची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे पाहून अॅड. जी. बी. कुलकर्णी यांनी खंडपीठात तिची बाजूही कोणतेही शुल्क न घेता मांडली.


विवाहितेची खंडपीठात धाव  
२२ आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी घेण्यासाठी संगीताने ११ मे रोजी खंडपीठात धाव घेतली. वकील कुलकर्णी यांनी तिची तपासणी वैद्यकीय बोर्डामार्फत करण्याची न्यायालयास विनंती केली.  खंडपीठाने दोन दिवसात तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.  घाटीतील पाच डॉक्टरांच्या समितीने महिलेची १४ मे रोजी तपासणी केली.  डॉक्टरांनी गर्भपात केला जाऊ शकतो, असे अहवालात नमूद केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खंडपीठाने सुटीच्या दिवशी स्वत:हून प्रकरण मागवून घेतले. २१ मे रोजी केवळ सुनावणीच्या तारखा देण्यासाठी कोर्ट बसले होते. परंतु, या एका प्रकरणासाठी सुनावणी घेण्यात आली. डॉक्टरांच्या अहवालाचे आणि संगीताच्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता खंडपीठाने शासक्ीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी २२ मे पर्यंत डॉक्टरांसमोर महिलेस उपस्थित करण्यासंबंधी निवेदन केले होते. प्रकरणात सरकारच्या वतीने अॅड. ए. जी. नागोडे यांनी काम पाहिले.

 

महिलेस गर्भपाताचे आैषध दिले 
सदर महिलेस घाटीत दाखल करण्यात आले असून तिला गर्भपाताचे आैषध देण्यात आले. पुढील तीन दिवसात तिचा गर्भपात होईल. नाही झाला तर पुन्हा आैषध दिले जाईल असी माहिती घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे तज्ञ डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...