आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएचडी इच्छुकांची संख्या राज्यात 18 टक्के घटली; नोकरीची हमी नसल्याचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पीएचडी संशोधनाला देशभरातील विद्यापीठांमध्ये इच्छुकांची गर्दी होत असताना महाराष्ट्रात  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीएचडी करणाऱ्यांची संख्या तब्बल १७०१ म्हणजेच १८ टक्क्यांनी कमी झाली आहे. पीएचडी प्रवेशाचे क्लिष्ट नियम, प्रवेश परीक्षेची (पेट) वाढलेली काठीण्य पातळी, पेट उत्तीर्ण होऊनही गाइडची कमतरता, संशोधन करूनही नोकरी न मिळणे तसेच यूजीसीकडून दिल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या फेलोशिपवर मर्यादा आल्याने पीएचडीकडे ओढा घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या देशव्यापी सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. आतापर्यंत २०१२-१३ चा अपवाद वगळता राज्यात एकदाही ही संख्या घटलेली नव्हती. उलट दर वर्षी ती वाढतच होती. २०१५-१६ मध्ये ९२२९ विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी नोंदणी केली होती. २०१६-१७ मध्ये यात १७०१ ची घट होऊन ही संख्या ७५२८ वर आली आहे. विशेष म्हणजे देशभरात पीएचडी नोंदणीचा दर १२ टक्क्यांनी वाढला आहे. पूर्वी पीएचडीला सहज प्रवेश मिळत होता. पेट लागू झाल्यावर यावर मर्यादा आल्या. तर ऑनलाइन पेटमुळे प्रवेश अधिकच कठीण झाले आहेत. यूजीसीच्या वतीने संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, छात्रवृत्ती, अनुदानात कपात करण्यात आली आहे. त्याचाही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.


बामूमध्ये ५ हजारांहून अधिक संशोधक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आजवर ५२०० हून अधिक पीएचडी संशोधक  घडवले आहेत. तर आजघडीला ३१०० हून अधिक विद्यार्थी ५२ विषयात संशोधन करत आहेत. त्यांच्यासाठी विद्यापीठात ११०० हून अधिक मार्गदर्शक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...