आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ जवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघात; दोन जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गल्लेबोरगाव, वेरूळ- वेरूळ (ता.खुलताबाद) - येथील पेट्रोल पंपासमोर  ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रकचालने मोटारसायकलस्वारांना उडवल्याने झालेल्या अपघातात मालेगाव येथील दोन तरुण जागीच ठार झाले असून अखलाख अहमद महंमद युसूफ (३०) व इकबाल अहमद महंमद युसूफ(४०,रा. गोल्डननगर, मालेगाव, जि. नाशिक)  अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झाला.  


मालेगाव येथील महंमद इम्रान, एजाज अहेमद, अखलाख अहेमद, इकबाल अहेमद हे दोन मोटारसायकलवरून ईद निमित्ताने खुलताबाद येथे इजारतसाठी आले होते. दर्शन आटोपून सोमवारी रात्री अकरा वाजता मालेगावला जाण्यासाठी निघाले असता काही अंतर चालून आल्यावर वेरूळ गावानजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या एका ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विनापासिंग दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील अखलाख व इकबाल हे दोघेही बाजूला फेकले गेले व यात ते गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले.  


अपघाताच्या आवाजाने पेट्रोल पंपावरील नागरिक मदतीला धावून आले व वेरूळचे पोलिस पाटील रमेश धिवरे यांनी पोलिस स्टेशनला फोन लावून अपघाताची माहिती दिली. रात्रीची वेळ असल्याने संधी साधत ट्रकचालक मोटारसायकलला उडवून घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिस बीट जमादार वाल्मीक कांबळे, बाबासाहेब थोरात, पोलिस पाटील यांनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहिका बोलावून अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अपघाताची नोंद खुलताबाद पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून मोहंमद इम्रान याच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...