आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलजोडी नाही, सायकलीचे बनवले कोळपे; दोन्ही मुलींसह आईने स्वत: जुंपून घेत केली कोळपणी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरगाव अर्ज- घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. घरी केवळ ३० गुंठे शेतजमीन आणि त्यातच स्वत:कडे बैलजोडी नसल्याने बोरगाव अर्ज येथील सखूबाई व त्यांचे पती कल्याण दामू काळे या शेतकरी दांपत्याने कुणापुढे हात न पसरवता एक नामी शक्कल लढवली. घरातील जुन्या सायकलीचे कोळपे बनवून घेतले. सखूबाई काळे यांची मोठी मुलगी ज्योती काळे ही औरंगाबाद येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असून लहान मुलगी स्वाती ही अकरावीत आहे. परंतु, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी होणारी आई-वडिलांची ओढाताण पाहवत नसल्याने या दोन्ही मुलींनी आईसोबत हातात सायकलींद्वारे बनवलेले कोळपे घेऊन शेती पिकवण्यासाठी करत असलेली कसरत बघून त्यांच्या जिद्दीचे परिसरात कौतुक होत आहे.


सलग चार वर्षांपासून परिसरात दुष्काळाचे सावट आहे. परिणामी पाणी व चाऱ्याअभावी येथील अनेक पशुपालकांनी आपली जनावरे बेभाव विकली.  त्यामुळे यंदा बोरगाव अर्जसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केली आणि आता पेरणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साह्याने केली, तर काही करत आहेत. परंतु,  कपाशी व मक्याच्या अंतर्गत मशागत ट्रॅक्टरद्वारे होऊ शकत नाही.  


काही शेतकऱ्यांचे अजूनही पेरणीचे काम सुरू अाहे, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात कोवळ्या पिकांनी माना वर काढल्या आहेत, त्यामुळे कोळपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोळपणीसाठी बैल आणावेत कुठून  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलजोड्या आहेत,  त्यांचा बैलजोडीचा रोज हा पाचशे ते सहाशे रुपये असल्याने हा खर्च अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारा नाही.  


असे बनवले कोळपे  
>स्वत:कडे बैलजोडी नाही आणि बैलजोडी आणून मशागत करण्यासाठी पैसेही नसल्याने येथील शेतकरी कल्याण काळे  यांनी घरातील जुन्या  सायकलीच्या चाकामधील एक्सलमध्ये दोन्ही बाजूला दोन लोखंडी गज लावून कोळपे बनवत पास बसवली. हँडललाही दोन्ही बाजूस तीन फुटांचे दोन लोखंडी गज बसवले आणि या काेळप्याद्वारे जसे तण असेल त्याप्रमाणे थोडे दगड ठेवून या तिन्ही मायलेकींनी बैलाविना कपाशी कोळपणीचे काम केले.  
>कल्याण काळे हे गवंडी काम करतात, तर त्यांच्या पत्नी सखूबाई या शेतमजुरी करतात.  या काळे दाम्पत्याकडे फक्त ३० गुंठे जमीन असून त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. हलाखीची परिस्थिती असतानाही काळे यांनी त्यांची मोठी मुलगी ज्योती हिला औरंगाबाद येथे पॉलटेक्निकचे उच्च शिक्षण देत असून त्यांचे तिन्ही मुले शिक्षण घेत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी आम्ही हाल सोसत आहे. परंतु,  आमची मुले आमच्या कष्टाचे नक्कीच चीज करतील, असे सखूबाई काळे यांनी सांगितले.  

 

आई-वडिलांची मेहनत वाया जाऊ देणार नाही  
सुटीच्या दिवसात शेती व मजुरीच्या कामात आम्ही आई वडिलांना मदत करताे. आईवडील आमच्या शिक्षणासाठी घेत असलेली मेहनत वाया जावू देणार नाही. फावल्या वेळेत किंवा सुट्या असल्या तर अभ्यास करून शेतीच्या कामासाठी मदत करतो. मला माझ्या आईवडिलांचा अभिमान आहे.
- ज्योती काळे, विद्यार्थिनी, पॉलिटेक्निक कॉलेज, औरंगाबाद.

 

बातम्या आणखी आहेत...