आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला छेडल्याने 19 वर्षांच्या तरुणाचा भोसकून खून, आरोपी 24 तासांत जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पत्नीची छेड काढल्याचा आरोप करत रामेश्वर शिवलाल पवार या १८ वर्षीय तरुणाने रवींद्र कल्याण जाधव या १९ वर्षांच्या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. चिकलठाणा ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली तोळानाईक तांडा येथे घडलेल्या घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हा गुरुवारी रात्री त्याच्या घरी टीव्ही पाहात बसला होता. त्यावेळी रामेश्वरने त्याला बाहेर बोलावून शेतात नेले. त्याच ठिकाणी त्याने रवींद्रच्या पोटात आरपार चाकू भोसकला, अंगावर पाच वार केले आणि तेथून पळ काढला. 
 
रवींद्र घरी परतला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. तेव्हा गावाजवळ असलेल्या शेतात रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. त्याला तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घटनेचे वृत्त कळताच चिकलठाणा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक संदीप साळुंके, मीना तुपे, हवालदार एस.आर. राठोड, के. बी लुटे, बी.एन ठोकळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. विचारपूस केल्यानंतर रामेश्वरवरील संशय बळावला. त्यानुसार चिकलठाणा पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली. रामेश्वर बाळापूर शिवारात असल्याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याची विचारपूस केली असता रवींद्रने माझ्या बायकोची छेड काढली होती. म्हणून माझ्या मनात त्याच्याविषयी राग असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती निरीक्षक ताईतवाले यांनी दिली. 
 
समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात: घाटीतील शवविच्छेदन विभागात रवींद्रचा मृतदेह आणण्यात आला. मात्र आरोपीला अटक करेपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यावर ताईतवाले यांनी कुटुंबीयांची समजूत काढून आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. घटनेनंतर २४ तासांच्या आत संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपाधीक्षक अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. 

 
बातम्या आणखी आहेत...