आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : उस्मानपुर्‍यात 29 लाखांची घरफोडी; दागिने व रोख रक्कम लंपास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रतिष्ठित फर्निचर व्यापारी परेश सुरेश ठक्कर यांचे घर फोडून सोमवारी (28 जानेवारी) मध्यरात्री 330 ग्रॅमचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख दहा लाख 65 हजार असा 29 लाख 25 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. उस्मानपुर्‍यातील युनिक पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या ठक्कर फर्निचर येथे ही घटना घडली.

मंगळवारी (29 जानेवारी) सकाळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानाने रमानगरातील पाण्याच्या टाकीपर्यंत चोरांचा माग काढला. मात्र, चोरांच्या बोटांचे ठसे पोलिसांना प्राप्त झाले नाहीत. ठक्कर यांचे दुकानाच्यावरच घर आहे. भावाच्या मुलीचे लग्न असल्याने ठक्कर यांची पत्नी व मुलगा, मुलगी हे तिघेही नांदेडला गेले होते, तर ठक्कर हे एकटेच घरी होते. सोमवारी रात्री ठक्कर यांनी दुकान बंद केले. त्यानंतर ते दुकानाच्या पाठीमागील दरवाजाने घराच्या चौथ्या मजल्यावर गेले. रात्री 9.30 ते 10 वाजेच्यादरम्यान त्यांनी मित्राकडे जेवायला जायचे म्हणून तिसर्‍या व चौथ्या मजल्यावरील लाकडी दरवाजा केवळ ओढून घेतला. मध्यरात्री चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील पत्र्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले. यानंतर चौथ्या मजल्यावर गेलेल्या चोरट्याने दोन लाकडी कपाटाचे कुलूप तोडले. यामधील हिरेजडीत हार, मंगळसूत्र, चेन, बांगड्या, कानातले, ब्रेसलेट असे 330 ग्रॅमचे दागिने आणि 10 लाख 65 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. लॅपटॉप बॅगमध्ये असलेले 5 लाखांचे दागिने जशास तसे होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त विजय पवार, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठक्कर यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.