औरंगाबाद - तब्बल 12 हजार किलोमीटर अंतर सायकलवर पार करणारा ए. नागराज हा ध्येयवादी ‘सायकलवेडा’ शुक्रवारी औरंगाबादेत धडकला. गेल्या चार महिन्यांपासून 19 राज्यांतील मुख्य शहरांतून नागराज यांची ‘टूर ऑफ इंडिया’ सुरू असून, पुढील महिनाभरात अजून 2 हजार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी हा नागराज सज्ज आहे.
विशेष म्हणजे केवळ अडीच हजार किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर त्यांच्या नावाने ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवले जाणार होते; परंतु तेवढ्यावर समाधान न मानता नागराज यांनी पाचपट अधिक टार्गेट पूर्ण केले आहे. 36 वर्षीय नागराज यांचे सूक्ष्म नियोजन, धडाडी-उत्साह आणि काहीतरी करून दाखविण्याची जिद्द ही पाहणा-या-ऐकणा-याला खिळवून ठेवल्याशिवाय राहात नाही.
इंटरनेटवर प्रशिक्षण
-सायकलचे पॅशन आणि टूरची हौस जोपासण्यासाठी इंटरनेटला गुरू मानून नागराज यांनी शास्त्रीय प्रशिक्षण स्वत:च घेतले.
-स्टॅमिना, एकाग्रता, मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी कष्ट घेतले आणि त्यासाठी कित्येक शेकडो किलोमीटर सराव केला.
-त्यानंतर आयुष्यातील पहिला पाच दिवसांचा हैदराबाद-तिरुपती हा 660 किलोमीटरचा टूर डिसेंबर 2012 मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण.
- नंतर दिल्ली-अमृतसर-जम्मू-काश्मीर-श्रीनगर-कारगील-लेह-चॅँग ला- पेंगाँग-रोहतांगपास-मनाली-दिल्ली असा 3000 किलोमिटरचा 33 दिवसांचा टूरही नागराज यांनी पूर्ण केला.
टूरच्या डिझाईनासाठी सूक्ष्म नियोजन
अतिथंडीचे व फार मोठ्या प्रमाणावर पहाडी परिसर टाळून दर 100-125 किलोमिटरवर मुक्काम करता येईल, अशी शहरे व रस्ते निवडले आणि इंटरनेटच्या आधारे संपूर्ण देशातील टूरचे सूक्ष्मातीत नियोजन केले. त्यासाठी तब्बल चार महिने लागले. 14 ऑक्टोबर 2013 रोजी हैदराबादपासून ही रेकॉर्ड टूर सुरू झाली. चैन्नई, कन्याकुमारी, मेंगलोर, गोवा, मुंबई, अहमदाबाद, पोरबंदर, द्वारका, जैसलमेर, अमृतसर, दिल्ली, आग्रा, दालखोटा, विशाखापट्टणम, वारंगल, नागपूर, भोपाळ, शिरपूर, नाशिक, शिर्डी मार्गे नागराज औरंगाबादला आले. आता पुणे, सोलापूर, मैसूरमार्गे विविध शहरांना वळसे घालून हैदराबादपर्यंत ही टूर जाणार आहे.
बालवयातच प्रेरणा
बालवयात दूरदर्शनवर ‘गिनीज रेकॉर्ड’चा कार्यक्रम पाहून असे रेकॉर्ड आपणही करावे, असे कधीतरी मनावर कोरले गेले. मात्र शिक्षण-नोकरी आणि रहाटगाड्यात कधी संधी मिळालीच नाही. 14 वर्षे दुबईत नोकरीनिमित्त निघून गेली, तरीही मनातली इच्छा काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी अचानक राजीनामा देऊन नागराज मायदेशी हैदराबादेत परतले.