आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकोरीबद्ध जीवनाची चौकट दूर करून एड्सग्रस्तांसाठी आयुष्य वेचणारे सेवाव्रती दांपत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चाकोरीबद्ध जीवनाची चौकट स्वत:च्या हातांनी दूर करत आणि नातलग, समाजाचा प्रचंड विराेध झुगारून एड््सग्रस्तांसाठी आयुष्य वेचणारे संध्या आणि दत्ता बारगजे यांचे कार्य ११ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. या घरादारावर तुळशीपत्र ठेवावे लागूनही ही दोघे नेटाने कार्य करत आहेत. 

टाकळी (ता. केज) हे दत्ता यांचे गाव, तर केज तालुक्यातीलच तांबवा हे संध्याताईंचे माहेर. १९९८ मध्ये दत्ता बारगजे भामरागड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून रुजू झाले. संध्या याही भामरागडमधील एका महाविद्यालयात अध्यापन करू लागल्या. येथून दोन किलोमीटरवर प्रकाश आमटेंचा लोकबिरादरी प्रकल्प आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून बारगजे दांपत्याचा आमटे कुटुंबीयांशी संपर्क येत असे. आमटे कुटुंबीयांच्या कामाचा प्रभाव वाढत गेला तसा बारगजे दांपत्याने प्रत्येक सुटीला लोकबिरादरी प्रकल्पात जाणे सुरू केले. तेथे येणाऱ्या बाबा आमटेंचा प्रत्येक शब्द या दोघांना भारावून टाकायचा. बाबा नेहमीच सांगायचे, आनंदवनाची बेटं निर्माण करा. या वाक्यावर बारगजे दांपत्य अनेक दिवस विचार करत होते. अानंदवनचे बेट निर्माण करण्याचा त्यांचा निर्धार होता. 

दत्ता बारगजे हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ असल्याने एचआयव्ही, एड्सग्रस्तांशी त्यांचा नेहमीच संपर्क यायचा. निदान झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला येणारे उपेक्षित जीवन दत्तांनी जवळून पाहिले. त्या वेळी एड्स या आजाराबद्दल भीती खूप होती. एड्सने मृत्यू झालेल्यांची मुले निराधार होतात. त्यांना सांभाळण्याऐवजी त्यांचे नातेवाईकच दूर लोटतात. त्यामुळे एड््सग्रस्त मुलांचा सांभाळ करावा, याविषयी दत्ता आणि संध्या यांचे एकमत झाले. २००३ मध्ये बारगजेंची भामरागडहून बीड जिल्हा रुग्णालयात बदली झाली. त्यांनी आपली कल्पना मित्र, नातलगांसमोर मांडताच सर्वांनीच विरोध केला. मात्र, दोघांचा निर्धार कायम होता. सन २००४ मध्ये एक महिलेने मुलालाही एचआयव्ही झालाय, त्याला सांभाळा, अशी आर्त विनवणी केली. येथूनच बारगजे दांपत्याच्या सेवेला सुरुवात झाली. एड्सग्रस्त मुलाला त्यांनी घरी आणल्याचे समजताच नातलगांनी जाणे-येणे बंद केले. हळूहळू सहा मुले जमली. ही बाब सरकारी निवासस्थानातील शेजाऱ्यांना समजताच पुन्हा त्रास झाला. मग बीड शहराबाहेरील एका मठाच्या हॉलमध्ये बारगजे दांपत्याने त्या सहा मुलांसोबत राहायला सुरुवात केली. २०१० मध्ये स्वत:ची जागा घेण्यासाठी त्यांनी कार, प्लॉट आणि संध्याताईंचे स्त्रीधन विकले. बीड तालुक्यातील पाली येथे डोंगरावर जागा घेतली. पुढे राजीनामा देऊन पूर्णवेळ कार्य सुरू केले अन् 'इन्फंट इंडिया' ही संस्था उभी राहिली. आज या ठिकाणी ५५ एड्सग्रस्त मुले आहेत. 

तीन वेळा झाला हल्ला 
दत्तायांनी पूर्णवेळ हे काम करण्याचे ठरवताच त्यांना सर्वांनी वेड्यात काढले. पण, दत्ता आणि संध्याताई ठाम होत्या. पाली गावातूनही बारगजे दांपत्याला खूप विरोध झाला. तीन वेळा ग्रामस्थांनी हल्ला केला, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हाही दाखल झाला. पण, आता परिस्थिती खूप निवळली आहे. ग्रामस्थांनाही त्यांच्या कार्याचे महत्व समजले आहे. 
बातम्या आणखी आहेत...