आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Hand Become Lose And His Life Gone, Accident In Aurangabad

आयुष्याची पकड सैल झाली अन् जीव गेला!,औरंगाबादेतील विचित्र अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारी पहाटेचे साडेपाच वाजले होते. औरंगाबादेतील देवळाई चौकातून चौघे लोडिंग रिक्षाने गारखेड्याकडे निघाले होते. शिवाजीनगर रेल्वे रुळाकडे रिक्षा वळणार तेवढ्यात अचानक मागाहून भरधाव ट्रक धडकला आणि नियंत्रण सुटलेली रिक्षा 50 मीटर अंतरावरील विहिरीत कोसळली. रिक्षात झोपलेले दोघे बाहेर फेकले गेले, तर चालकासह दोघे विहिरीत कोसळले. त्यातही दोघांनीही विद्युत मोटारीच्या दोरखंडाची दोन टोके पकडली. पण एकाच्या आयुष्याची पकडच सैल झाली. तो विहिरीत कोसळला आणि दगडावर आपटून गतप्राण झाला. या मृताचे नाव गजानन बांगर.
घटना घडताच शेजारच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला फोनाफोनी केली. मृत गजानन आणि रिक्षाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले. त्याआधीच वाहक सतीश दोरखंडाचे टोक पकडून कसाबसा विहिरीच्या वर आला होता. बाहेर फेकले गेलेले दोघे जखमी झाले. विजय शिरसाट (25, रा. सेनगाव) यांची रेनो जीप बिघडल्यामुळे गजानन मंदिर चौकातील आर्यन गॅरेजवर लावली होती. जीपचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी गॅरेज मेकॅनिक विष्णू श्रीरंग धोत्रे (30) व सतीश पांडुरंग खिल्लारे (25, दोघेही रा. सेनगाव, जि. हिंगोली) यांना जीप नेण्यासाठी औरंगाबादला येण्यास सांगितले. त्यांनी गजानन भगवान बांगर (20, रा. मकोडी, ता. सेनगाव) यांची लोडिंग रिक्षा (एमएच 38 ई 2018) भाड्याने घेतली. रात्री 12.30 च्या सुमारास चौघेही औरंगाबादच्या दिशेने निघाले. रिक्षा गजानन चालवत होता. त्याच्या शेजारी सतीश बसलेला होता. पाठीमागे विष्णू आणि विजय झोपलेले होते. शिवाजीनगर रेल्वे रुळाकडे वळण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. विष्णू आणि विजय बाहेर फेकले गेले, तर रिक्षा पैठण रोडकडे जाणा-या एका शाळेसमोरील कठडे नसलेल्या विहिरीत पडली. विहिरीतील विद्युत मोटारीच्या दोरखंडाच्या एका टोकाला सतीशने, तर दुस-या टोकाला गजाननने पकडले. त्यांची आरडाओरड सुरू असतानाच लोक धावून आले. दरम्यान, गजाननचा विहिरीत कोसळून मृत्यू झाला. जखमी सतीशला बाहेर काढण्यात आले. थोडा वेळ विष्णू आणि विजय यांना काय झाले हेच समजले नाही. घटना कळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी गजाननचा मृतदेह व वाहन बाहेर काढले.
शेवटी मृत्यूने गाठलेच : विहिरीवर वीजपंपाला आधार देणा-या दोरखंडाला दोघांनीही पकडून ठेवले. जिवाचा आकांत सुरू होता. दुर्दैवी गजाननच्या हातून मात्र दोर निसटला आणि विहिरीत दगडावर आपटून त्याचा मृत्यू झाला.