आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज वाहिनीवर पडलेल्या गवंड्याचा जागेवर कोळसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्युतवाहिनीत अडकलेला गुलाबराव खरात यांचा मृतदेह.
औरंगाबाद- इमारतीच्या प्लास्टरचे काम करताना गवंड्याचा (बांधकाम मजूर) तोल जाऊन तो ११ केव्ही विद्युत वाहिनीवर पडला आणि काही मिनिटांतच त्याच्या शरीराचा कोळसा झाला. दोन्ही पाय भाजल्याने गळून पडले तर धड तारेवरच लटकून राहिले. विद्युत पुरवठा खंडित करून तारांवर लटकलेला मृतदेह खाली उतरवण्यात आला. हा भीषण अपघात एन-७ मधील अयोध्यानगरात घडला. गुलाबराव खरात(५५, रा. आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे.

अयोध्यानगरातील विनोद तळोकात यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास गुलाबराव खरात प्लास्टरचे काम करत असताना त्यांचा तोल गेला थेट विद्युत वाहिनीवर कोसळले. त्यांचे पाय वाहिनीत अडकल्याने त्यांना जबर शॉक लागला. त्यांचे पाय गुडघ्यापासून भाजून निघाल्याने ते निखळून जमिनीवर पडले. शरीरही वाहिन्यांना चिकटल्याने कोळसा झाले. नागरिकांनी काही उपाययोजना करण्यापूर्वीच देहाचा कोळसा होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेने विद्युत वाहिन्यांत स्पार्किंग होऊन मोठा अावाज झाला. घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर त्यांचा विद्युत वाहिन्यांत अडकलेला मृतदेह खाली उतरवून घाटीत उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनेची सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

आणखीकिती बळी घेणार :
लोंबकळणाऱ्याइमारतीला स्पर्श करणाऱ्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी अयोध्यानगरातील नागरिक २००९ वारंवार महावितरणकडे करत आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे आतापर्यंत पाच जणांचा शॉक लागून मृत्यू झाला असून चार जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. लोकसहभागातून जो खर्च येईल तो आम्ही करण्यास तयार आहोत, असे महावितरणला सांगून देखील काहीच उपयोग झाला नाही. महावितरण किती बळी घेणार असा प्रश्न येथील रहिवासी पृथ्वीराज राठोड, जयहरी गवळी, सचिन भंगड यांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा अहवाल विद्युत निरीक्षक पंचनामा करून देतील. विद्युत वाहिन्यांजवळ काम करत असताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. अंतर ठेवावे. अपघातप्रवण स्थळांचे सर्वेक्षण करून तेथे एअर बंच केबल, भूमिगत वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेऊ, असे कार्यकारी अभियंता भुजंग खंदारे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...