आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिसांना जेरीस आणणारा सराईत गुन्हेगार कल्ल्या अखेर गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहर पोलिसांना जेरीस आणणारा अट्टल घरफोड्या कल्ल्या ऊर्फ कलीम खान शबीर खान याला उस्मानपुरा पोलिसांनी रविवारी सकाळी परभणी येथून अटक केली. कल्ल्यावर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे ३६ गुन्हे दाखल असून उघडकीस आलेल्याअनेक घरफोड्या त्याने केल्या आहेत. 

घरफोडीत चोरीला गेलेला एक मोबाइल उस्मानपुरा पोलिसांना सापडला होता. उस्मानपुऱ्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने तो विकत घेतला होता. उस्मानपुरा ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी त्याची विचारपूस केली असता, हा फोन मी परभणी येथील माझ्या ओळखीच्या व्यक्तीकडून घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार राहुल काळे आणि ज्ञानेश्वर कोळी यांच्या पथकाने परभणीला जाऊन उस्मानपुऱ्यातील व्यक्तीला फोन विकलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. चौकशीत त्याने हा फोन मी तिसऱ्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो कल्ल्या असल्याचे उघडकीस आले. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. मात्र कोळी आणि काळे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला परभणी रेल्वे स्टेशन परिसरातून पकडले. 

यासाठी परभणी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेळके यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पाच महिन्यांपूर्वी कल्ल्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानपुरा परिसरातील त्याच्या राहत्या घरासमोर सापळा लावला होता. मात्र याची खबर त्याला मिळाल्यामुळे घरासमोर पोलिस उभे असताना तो मागच्या दरवाजाने पळाला होता. 

चोऱ्या करायचा परभणीत राहायचा 
रात्रीच्यावेळी बंद घराचे कुलूप काही क्षणात तोडून काही मिनिटांत घर साफ करणाऱ्या कल्ल्याने शहर पोलिसांना जेरीस आणले होते. आतापर्यंत त्याने उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीत २८, क्रांती चौक आणि जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याचे तपासात पुढे आले. त्याच्या चौकशीतून अजून काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरी, घरफोडी, पोलिसांवर हल्ला, ताब्यातून पळून जाणे, धमकी देणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे असे आरोप कल्ल्यावर आहेत. शहरातील टॉपमोस्ट वांॅटेंडच्या यादीत कल्ल्याचे नाव पहिल्या पाचमध्ये आहे. तो शहरात चोऱ्या करायचा आणि परभणीत जाऊन राहायचा, असे तपासात समोर आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...