आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Rupee Two Wheeler Run 4 Kms, Aurangabad Sahas Made Moped

रुपयात ४ किमी; औरंगाबादच्या साहसने बनवली दुचाकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहस चितलांगे - Divya Marathi
साहस चितलांगे
औरंगाबाद - औरंगाबादच्या साहस दिनेश चितलांगे या १६ वर्षांच्या युवकाने अवघ्या १६ हजारांत टाकाऊ वस्तूंचा वापर करून दुचाकी तयार केली आहे. बॅटरीवर धावणा-या या मोपेडला सायलेन्सर नसल्याने प्रदूषणही होत नाही. चालवण्याचा खर्चही प्रतिकिमी २५ पैसे आहे.

साहसच्या इलेक्ट्राॅनिक सर्किटने ही कमाल केली. त्याच्या आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी प्रयत्नही सुरू आहेत. त्याची बहीण साक्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहे. बहिणीच्या बुद्धीकौशल्याएवढीच प्रतिभा साहसमध्ये असल्याचे त्याच्या मोपेड निर्मितीवरून लक्षात येते. गारखेड्यातील स्वप्ननगरीत राहणारा साहस स.भु. महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिकतो. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला जगावेगळ्या वस्तू तयार करण्याचा छंद आहे. त्याने तीन वर्षापू्र्वी शाळेत जाण्यासाठी इको फ्रेंडली बाइक तयार केली होती. ती एका चार्जिंगवर १७ कि.मी.चालायची. मग त्याने आणखी संशोधन करीत आता इको फ्रेंडली मोपेड तयार केली.

अशी केली निर्मिती...
भंगारातून किलोवर विना इंजिनाची एक सनी मोपेड १५०० रुपयांत विकत घेतली. त्यानंतर दुचाकीचे इंटर्नल डिझाइन, इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार केले.
1.गाडीचा सांगाडा व्यवस्थित केला. वजन 60 किलो हवे म्हणून घराच्या गॅलरीवर लावलेल्या पॉलिकार्बोनेटच्या पत्र्यांपासून दुचाकीची बॉडी बनवली.
2.१२ व्होल्टची लेड अॅसिडची बॅटरी घेत २२० वोल्टची कट ऑफ सिस्टिम तयार केली. शॉर्टसर्किट टाळण्यासाठी एमसीबी (मेकॅनाइझ सर्किट ब्रेकर) वापरले.
3.स्कूटरमधे ४ बॅट-या टाकल्या. ५ तास चार्जिंगवर दुचाकी कमाल ताशी ६०च्या वेगाने धावते. हेड- टेल लॅम्प, हॉर्न, इंडिकेटर, स्पीडोमीटर बॅटरीवरच चालते.

बहीण साक्षीही अाहे प्रतिभावंत
साहसची बहीण साक्षीने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली आहे. अासियान बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये १५ वर्षाखालील महिला अांतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान पटकावला. ही पदवी पटकावणारी साक्षी देशातील पहिली महिला बुद्धिबळपटू आहे.

स्वत:च्या दुचाकीवर कॉलेज जाण्याचा हट्ट
स्वत: तयार केलेल्या मोपेडवरच कॉलेजला जायचे या हट्टापोटी साहसने मोपेड बनवली. तो कॉलेज, कोचिंग क्लासला मोपेडवरच जातो.
- दिनेश चितलांगे, साहसचे वडील (बांधकाम व्यावसायिक)