आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक झाड अन् बारा भानगडी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपत्कालीन परिस्थितीत मनपाची यंत्रणा काम लवकर करण्याऐवजी घोळच वाढवते याचे उदाहरण रविवारी पाहायला मिळाले. एक झाड पडले आणि ते हटवण्यासाठी ज्या बारा भानगडी घडल्या त्या पाहता आपत्कालीन सेवाच आजारी पडल्याचे दिसून आले.
त्याचे असे झाले की, छत्रपती शिवाजी महाविद्यालयासमोर दुपारी एक झाड अचानक उन्मळून पडले. रस्त्यावर आडव्या पडलेल्या या झाडाने तनसुख झांबड यांच्या कंपाउंड वॉलचाही भाग व्यापून टाकला. सगळा रस्ताच बंद झाला. हे झाड हटवण्यासाठी नगरसेवक प्रमोद राठोड यांनी प्रयत्न सुरू केले आणि एकापाठोपाठ एक अजब अनुभव आले. राठोड यांनी फोन केला आणि अग्निशमन दलाची गाडी पाठवण्यास सांगितले. पलीकडून गाडी पाठवत असल्याचे उत्तर मिळाले. बराच वेळ गाडी आली नाही म्हणून पुन्हा फोन केला तर गाडी केव्हाच गेली, असे उत्तर मिळाले. राठोड यांनी थोड्या वेळाने गाडी आली नाही म्हणून क्रॉस चेक केले तेव्हा गाडी निघालीच नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी झापाझापी करताच आग विझविण्याचा बंब घेऊन पथक आले. त्यांच्याकडे झाड कापण्यासाठी गंजलेल्या कुर्‍हाडी होत्या. या कुर्‍हाडींनी झाड तोडणे अशक्य असल्याचे समजताच राठोड यांनी पुन्हा शिवाजी झनझन यांना फोन करून रेस्क्य़ू व्हॅन पाठवण्याची सूचना केली. त्यांनी होकार दिला, पण गाडी आलीच नाही.
पुन्हा फोन केला तर ड्रायव्हर नसल्याचे कारण सांगण्यात आले. राठोड यांनी कडक भूमिका घेताच अखेर अग्निशमन दलाचे अधिकारी दांडगे स्वत: गाडी घेऊन आले. त्यांच्यासोबत आलेल्या पथकाला या व्हॅनमध्ये बचावकार्याचे साहित्य व उपकरणे ठेवण्याच्या रॅकची चावीच सापडेना. कशीबशी चावी सापडली आणि कटरने झाड कापण्याचे काम सुरू झाले. पण कटर बंद पडले! अखेर तिसरी गाडी बोलावण्यात आली तेव्हा नव्या कटरने हे झाड तोडण्यात आले आणि एकदाचे ते हटवण्यात आले. नगरसेवक प्रमोद राठोड यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले.