आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या दुचाकीवरून पडून विवाहितेचा मृत्यू; पतीच्या डोळ्यांसमोरच घडला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- धावत्या दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर इजा झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ज्योती शालिक वाकळे (३५, रा. मातोश्रीनगर, रांजणगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. 

साजापूर येथील नातलगाच्या मुलाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्या भाऊ राजू पाटोळे यांच्या दुचाकीवर (एमएच २० ईए १४६०) रांजणगावकडे येत होत्या. एनआरबी कंपनीसमोरील गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने ज्योती रस्त्यावर कोसळल्या. राजूने तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला फोन करून रुग्णवाहिकेने घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार जी. डी. खंडागळे करत आहेत. 

पतीच्या डोळ्यांसमोर घडला प्रकार...
ज्योती या भावाच्या दुचाकीवर, तर त्यांचे पती शालिक हे दुसऱ्या नातेवाइकाच्या दुचाकीवरून येत होते. शालिक यांच्यासमोरच ही घटना घडली. त्यांनीच ज्योती यांना रुग्णवाहिकेत टाकले होते. वाकळे कुटुंबीय मूळचे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील असून चार वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी ते औरंगाबादला आले होते. शालिक खासगी कंपनीत नोकरी करतात. लग्न होऊन पाच वर्षे होऊनही अपत्य नसल्याने ज्योतीवर उपचार सुरू होते. ज्योती दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या असे शालिक यांनी सांगितले. मात्र, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात ती गर्भवती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे तपास अधिकारी खंडागळे यांनी सांगितले. 

चार दिवसांतील दुसरी घटना 
दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची ही चार दिवसांतील दुसरी घटना आहे. शनिवारी दुपारी दूध डेअरी चौकात प्रथमा वाटोरे (२४) या तरुणीचा दुचाकीवरून पडल्यानंतर कारखाली चिरडून मृत्यू झाला होता. चिकलठाणा येथील येथील एका परीक्षा केंद्रावर प्रोबेशनरी आॅफिसर पदाची पूर्वपरीक्षा देण्यासाठी ती भावासोबत निघाली होती. 
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...