आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्जासाठी आता आधार कार्ड अनिवार्य, सवलतीच्या 7% दराने मिळणार कर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेतकऱ्यांना अाता पीक कर्जासाठी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (अारबीआय) तसे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना सवलतीच्या ७ टक्के व्याजदरात तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज उपलब्ध होऊ शकते. याची परतफेड नियमित केल्यास त्यावर ४ टक्के व्याजदर आकारला जाईल, असे रिझर्व्ह बँकेच्या सूचनापत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांना विनाअडथळा व्याज सवलतीचे लाभ मिळण्यासाठी २०१७-१८ मध्ये देण्यात येणाऱ्या पीक कर्जासाठी आधार अनिवार्य करावे, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने या पत्रात सर्व बँकांना दिला आहे.  
 
शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षांत तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज ७ टक्के या सवलतीच्या व्याजदरात देण्यात येणार आहे. ही सवलत कर्ज दिल्यापासून ते परतफेडीपर्यंत किंवा संबंधित बँकेने ठरवलेल्या तारखेपर्यंत मिळणार आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत ही सवलत जास्तीत जास्त एक वर्षासाठी मिळणार आहे. नियमितपणे या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१७-१८ या वर्षासाठी केवळ चार टक्के व्याज लागेल. अशा प्रकारे नियमित कर्जफेड करणाऱ्यास व्याजात तीन टक्के अधिकची  सवलत मिळणार आहे.
 
नैसर्गिक अापत्ती असणाऱ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक वर्षासाठी सर्वसाधारण व्याजदरावर दोन टक्के सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षापासून पुन्हा सर्वसाधारण व्याजदर त्या पीक कर्जसाठी लागू राहतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.  एखाद्या शेतकऱ्याला सोने तारण ठेवून कर्ज घ्यायचे असल्यास, बँकांनी त्याच्या जमिनीची व सोन्यासंबंधीची सर्व कागदपत्रे योग्य रीतीने तपासून, पडताळून कर्ज द्यावे, असे रिझर्व्ह बँकेने सुचवले आहे.  

काढणीनंतर सवलत
पीक काढणीनंतर तो कृषी माल तत्काळ विकण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर येते. त्यामुळे कमी भावात माल विकावा लागतो. याचा ताण लघु व सीमांत शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी काढणीपश्चात सहा महिने कालावधीसाठी व्याज सवलत देता येईल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यासाठी  माल गोदामात ठेवल्याच्या  पावत्या  द्याव्या लागतील.  
 
बातम्या आणखी आहेत...