आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आधार’साठी दलाल उकळताहेत ५० ते २००, अद्याप कोणावरही कारवाई नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आधारकार्ड नोंदणीसाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु अमुक एक कागद नाही, असे सांगून आधार नोंदणी केंद्रावर दलालांकडून ५० रुपयांपासून दोनशे रुपये आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. तसे असल्यास थेट आमच्याकडे तक्रार करा, पण कोणालाही पैसे देऊ नका, कारण आधार नोंदणी मोफत असल्याचे आधार योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत आधारसाठी पैसे मागण्यात येत असल्याच्या तक्रारी तहसीलदार तसेच अडकुणे यांच्याकडे आल्या आहेत. शासनाकडून कोणतेही शुल्क नसताना दलाल ५० ते २०० रुपये उकळत असल्याचे सांगण्यात आले. कोणी थेट लेखी तक्रार केल्याने आतापर्यंत कारवाई होऊ शकलेली नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के नागरिकांनी आधार कार्ड काढले आहे. फक्त १० टक्के नागरिक बाकी असून त्यात अंगणवाडी बालवाडीत शिकणाऱ्या मुलांचीच संख्या जास्त असल्याचे समोर येते. त्यासाठी अशा अंगणवाड्या बालवाड्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यातील ५० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील १०० टक्के नागरिकांकडे आधार कार्ड असू शकेल.

यात अंगणवाडी बालवाडीचे विद्यार्थी- लाख३३ हजार ५०
आतापर्यंत आधार कार्ड काढलेले नागरिक -३३ लाख १५ हजार ०३४
‘आधार’ काढलेले नागरिक -लाख ८० हजार
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या- ३५लाख ९५ हजार ९२८

कोणी पैसे मागत असेल तर येथे करा संपर्क
उपजिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे आधार योजनेसाठी जिल्ह्याचे नोडल अधिकारी आहेत. आधार कार्ड काढण्यासाठी कोणी पैसे मागितले तर आपण संबंधित ठिकाणचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकता. नोडल अधिकारी अडकुणे यांच्याकडे तक्रार करायची असल्यास ९४२३७७७३८८ या मोबाइल क्रमांकावर तक्रार करता येईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आधार कार्ड काढण्यासाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

येथे होतो घोळ
प्रशासनाकडूनजिल्ह्यात ४६ केंद्रे आहेत. तेथे मोफत आधार कार्ड काढून दिले जाते. त्याचबरोबर सोयीचे व्हावे म्हणून २५ अशासकीय संस्थांना हे काम देण्यात आले आहे. तेथेच पैशांची मागणी होत असल्याचे समोर येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आधार नोंदणीचे केंद्र सरकारी असो वा खासगी कोठेही पैसे आकारता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लुबाडणूक
तक्रारी करा : आधारकार्डची नोंदणी करण्यासाठी काही केंद्रांवर पैसे मागण्यात येत असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या. ही योजना नि:शुल्क आहे. पैसे मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे आधारची नोंदणी करताना कोणीही पैसे देऊ नये, जर कोणी पैसे मागत असेल तर आमच्याकडे थेट तक्रार करावी. आधार कार्डची नोंद मोफत आहे, हे लक्षात ठेवावे, अशी माहिती आधार योजनेचे नोडल अधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी दिली.