आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadami Party News In Marathi, Aurangabad Lok Sabha Constituncy, Divya Marathi

‘आप’ने खरेदी केले आठ हजार झाडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एरवी झाडूंची एकगठ्ठा खरेदी केली जात नाही. मात्र, आम आदमी पक्षाने आपले निवडणूक चिन्ह म्हणून झाडूचा स्वीकार केला, तेव्हापासून प्रचारासाठी झाडूंची मागणी वाढली आहे. एकट्या औरंगाबादमध्ये आपने आठ हजारांवर झाडूंची खरेदी केली आहे. त्याचबरोबर टोप्यांनाही सध्या मागणी वाढली आहे.


निवडणुकांमध्ये प्रचार चिन्हाला सर्वाधिक महत्त्व असते. त्यामुळे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो. त्यामुळे आपने प्रचार सभा तसेच रॅलीमध्ये प्रचारासाठी झाडूचा वापर सुरू केला आहे.


आणखी एक हजार झाडूंची मागणी
आपतर्फे तीन विक्रेत्यांकडून झाडूंची खरेदी केली जात आहे. पक्ष तसेच स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही झाडूंची खरेदी होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आपने सुमारे आठ हजार झाडूंची खरेदी केली असल्याची माहिती आपचे जिल्हा सचिव हरमितसिंग यांनी दिली. आणखीही हजारावर झाडू लागतील, असे त्यांनी सांगितले. आपचे उमेदवार लोमटे यांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्या वेळी सर्वांच्या हातात झाडू होता. आपमुळे टोप्यांनादेखील मागणी वाढली आहे. आपने आतापर्यंत 25 हजार टोप्या खरेदी केल्या आहेत. टोप्या कमी पडत असल्यामुळे पुन्हा नव्याने पंधरा हजार टोप्यांची ऑर्डर देण्यात येणार आहे.


राजकारणातील घाण साफ करणार
आपकडून शिस्तीत प्रचार केला जात आहे. झाडूच्या माध्यमातून राजकारणातली घाण साफ करण्यात येणार असल्याचा प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे रॅलीनंतर हे झाडू पक्षाकडून परत घेतले जातात. कार्यकर्तेदेखील प्रचारानंतर ते परत करतात.


हलक्या झाडूंचा वापर
प्रचारासाठी वापरले जाणारे झाडू वजनाने हलके आहेत. त्याची किंमत सहा रुपये इतकी आहे. प्रचारकांना तो दिवसभर घेऊन फिरता येईल आणि त्यांचे हातही दुखणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. आपने आमच्याकडून दीड हजारावर झाडू खरेदी केले असल्याची माहिती एस. एस. एंटरप्रायजेसचे संदीप नागर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. तसेच मतदानाचा दिवस जवळ येत असल्यामुळे मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.