आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Leader Vijay Pandhare On Maharashtra Irrigation Scam

लोकायुक्तांकडे पहिली तक्रार सिंचन घोटाळ्याची - विजय पांढरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील सिंचन घोटाळय़ाची चौकशी करणार्‍या डॉ. माधवराव चितळे समितीचा अहवाल एक-दीड महिन्यात अपेक्षित आहे. अहवाल कसा असेल हे सांगण्याची गरज नाही. परंतु याविरोधात लोकायुक्तांकडे पहिली तक्रार दाखल करून दाद मागितली जाईल, असे सिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता व आम आदमी पार्टीचे सदस्य विजय पांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चितळे समिती अहवालात अधिकार्‍यांवर बोट ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. शेकडो अधिकार्‍यांची चौकशी होईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील.
खरे दोषी मात्र सुटतील. पण आम्ही गप्प बसणार नाहीत, असा इशारा पांढरे यांनी दिला. अहवालाचा खरा फायदा म्हणजे त्यातून विस्तृत अभ्यास करायला मिळेल. प्रचंड माहिती समोर येईल. लोकपाल विधेयक संसदेत पारित झाले आहे. आता सर्व राज्यांना लोकायुक्त नेमावा लागणार आहे. राज्यातील लोकायुक्तांकडे सिंचन घोटाळय़ाचीच पहिली तक्रार असेल. सीबीआय चौकशीची मागणी आम्ही करू. यामुळे पुन्हा घोटाळे करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आदर्शप्रमाणे सरकारने अहवाल फेटाळल्यास काय, असे विचारले असता पांढरे म्हणाले की, सरकार आतापर्यंत हे फेटाळतच आले आहे. पण चितळे काय अहवाल देतात त्यावर पुढील दिशा ठरणार आहे. अहवाल मात्र लवचिकच असेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला. या पत्रपरिषदेला पक्षाचे राष्ट्रीय सदस्य मयंक गांधी, राज्य संयोजक अंजली दमानिया आदींची उपस्थिती होती.
केंद्रेकरांसारखे अधिकारी हवेत
देशात आमची सत्ता आली तर सुनील केंद्रेकरांसारख्या सत्यवादी अधिकार्‍यांची योग्य ठिकाणी नियुक्ती केली जाईल. अशा अधिकार्‍यांची देशाला खरी गरज आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांना व नेत्यांना चाप दिला जाईल. अशी भूमिकाही पांढरे यांनी स्पष्ट केली.