आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आप'ने उचलला शेतकरी पाल्यांचा शैक्षणिक खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निसर्गाची अवकृपा, सरकारचा दुजाभाव प्रशासनाची असंवेदनशीलता या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार नाममात्र लाखाची मदत देऊन मोकळे होते. त्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे पहिले जात नाही. अशाच दुर्लक्षित कुटुंबीयांचे आम्ही शेतकरी संवाद यात्रा काढून सर्वेक्षण केले असून अनेक मुला-मुलींचे शिक्षण थांबले आहे. यापैकी गरजू १०५ मुला-मुलींचा १२ वीपर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याची हमी घेतली आहे. सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलेला नोकरी द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे (आप) राज्य संयोजक सुभाष वारे यांनी केली.
बुधवारी कलश मंगल कार्यालयात आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता, वारे, सहसंयोजक राजू भिसे, अंजन सिन्हा यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला मुलांच्या वार्षिक शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. या वेळी वारे म्हणाले की, आपच्या वतीने १७ ते २४ मे दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली होती. एकूण २६ गावांत जाऊन शेतकरी शेतमजुरांशी संवाद साधला. आत्महत्याग्रस्त ३८ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कर्जाचा डोंगर, मुलामुलींचे थांबलेले शिक्षण आदींचा अहवाल ३० मे रोजी मुख्यमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. या विरोधात जून रोजी सर्व जिल्ह्यांत सरकारला फाशीचा दोर भेट देऊन थाळीनाद आंदोलन केले. याचाही उपयोग झाला नाही. हुजूरगिरीचे सरकार असल्याने आम्ही वेळ घालवता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरू केले आहे.
आत्महत्या रोखणे सर्वांची जबाबदारी : एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी जबाबदारी उचलायला हवी, असे आवाहन अंजन सिन्हा यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा चौधरी यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जाचे पुनर्गठण करून सर्वांना पीक कर्ज मिळेल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव या वेळी आपने मंजूर केला.
बळीराजाचे सरकार येईल
दिल्लीच्या जनतेने आपल्या मताधिकारातून सर्वच पक्षांना संदेश दिला आहे. त्याच धर्तीवर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आप तुमच्यासमोर उत्तम पर्याय असेल. यातून बळीराजाचे सरकार येईल. सक्षमीकरण सबलीकरणावर आम्ही विशेष भर देणार आहोत, असा विश्वास राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...