आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Wokers Of Maharashtra Going To Delhi For Assembly Elections

दिल्लीसाठी ‘आप’ची महाराष्ट्रातून कुमक, व्हायचे आहे पुन्हा राजधानीत बाप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजधानी दिल्लीत जानेवारी-फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये (आप) नव्या जोमाने तयारी सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेला केजरीवालांचा पक्ष यंदा पुन्हा दिल्लीचे सिंहासन काबीज करण्यासाठी तयारीला लागला आहे.
गेल्या वेळी देशभरातील कार्यकर्त्यांची फौज आपने दिल्लीत वापरली. यंदाही तोच फंडा हा पक्ष वापरणार आहे. महाराष्ट्रातून या पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत फार आधार मिळाला नाही. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह थोडा कमी झाला असला तरी त्यांनी जिद्द मात्र सोडलेली नाही.या निवडणुकीतही आपची महाराष्ट्रीयन कुमक विविध भागातून दिल्लीत प्रचारासाठी जात आहे. कार्यकर्त्यांचे प्रमाण मात्र गेल्या वेळेपेक्षा कमी आहे.

जळगावातून १०० कार्यकर्ते जाणार
जळगाव : दिल्ली निवडणुकीसाठी जळगावातील सुमारे शंभर कार्यकर्त्यांसह खान्देशातून ३०० कार्यकर्ते प्रचारासाठी जाण्याचा अंदाज आहे. तीनशे
कार्यकर्ते टप्प्याटप्प्यांत जाणार आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिली टीम जाईल. प्रत्येक टीम ही दहा ते अकरा दिवस राहून प्रचाराचे काम करेल.
जळगाव जिल्ह्यातून ४० जणांची यादी : जळगाव जिल्ह्यातून दिल्ली निवडणुकीसाठी जाण्यासाठी अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. आज अखेर ४० जणांची यादी तयार आहे. त्यात वाढ होऊ शकते. ही संख्या शंभरच्या जवळपास जाऊ शकेल, असे जिल्हा समन्वयक मुकेश अग्रवाल यांनी सांगितले.

प्रभाव संपला मात्र धडपड कायम
नाशिक : अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन छेडण्यापासून दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर स्वखर्चाने तळ ठोकणा-या नाशिकमधील कार्यकर्त्यांचा उत्साह आता पूर्वीइतका राहिलेला नाही. पक्षाचा या भागात तेवढा प्रभावही राहिलेला नाही. तरीही दिल्लीत प्रचारासाठी पदरमोड करून जाण्याची धडपड चालवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्याचे लक्ष वेधून घेणारे आपचे उमेदवार, मेटाचे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांची अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली होती. आपचे नाशिक शहर व लगतच्या तालुक्यात २७ हजार सक्रिय सभासद आहेत. मात्र, पांढरे यांना लोकसभेला ९ हजारच मते पडली.

पश्चिम महाराष्ट्रात उत्साह मावळला
पुणे : पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून दिल्लीत कार्यकर्ते पाठवण्याच्या प्रयत्नात पक्षाचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर बहुतेक जिल्ह्यांमधून नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाजपच्या दिशेने वाटचाल केली आहे किंवा पक्षाचे काम थांबवले आहे. त्यामुळे जे राहिले आहेत त्यांच्यात पूर्वीचा उत्साह नाही. पुण्यातून लढलेले सुभाष वारे म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातून कार्यकर्ते जाणार आहेत. सध्या आम्ही पक्ष बांधणी करत आहोत. १५ दिवसांत पक्षाची कार्यकारिणी जाहीर करू.’ साता-यातून लाकसभा निवडणूक लढवलेले राजेंद्र चोरगे यांनी विधानसभा निडणुकीत शिवसेनेला मदत केली. आता ते भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत.

औरंगाबादेत कार्यकर्त्यांत उत्साह
औरंगाबाद : दिल्ली बहुमताने काबीज करण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते प्रचाराला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्या दृष्टीने मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांचे नियोजन केले जात आहे. एकूण १५० जणांच्या दिल्ली दौ-याचे नियोजन असून आयटी, कार्यालयीन, व्यवस्थापन, वक्ते असे वर्गनिहाय काम त्यांना दिले जाणार आहे. लोकसहभागातून खर्च भागवला जाईल. एक रुपया देणा-या आम आदमीचे योगदान आम्हाला महत्त्वाचे आहे. कारण तो आम आदमी पार्टीच्या विचाराशी तन मन धनाने जोडला जाईल, अशी माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष लोमटे यांनी दिली. पक्षाचे सचिव हरमितसिंग म्हणाले, आपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. ही निवडणूक आमच्यासाठी "करा किंवा मरा' अशी आहे. त्यामुळे आम्ही कुठेच कमी पडणार नाहीत.