आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘आप’चे शक्तिप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी सकाळी शहरातून रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रॅलीनंतर झालेल्या सभेत पक्षाच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी मनसे, राष्‍ट्र वादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

शहागंज येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. सिटी चौक, गुलमंडीमार्गे पक्षाच्या सिद्धिविनायक लॉन्स येथील कार्यालयात समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान गुलमंडी, सेव्हन हिल्स आणि नंदनवन कॉलनी येथील पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी झालेल्या सभेत दमानिया यांनी कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी काम करण्याची शपथ दिली. सभेत बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात आम्ही बाप आहोत, तर राष्टÑवादी म्हणते आम्ही आई आहोत. मात्र, अशा माय-बापांपेक्षा अनाथ असलेले बरे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. भ्रष्टाचार या शब्दाचा कंटाळा आल्याचे सांगत त्या म्हणाल्या, मोठ्या पक्षांचे नेते जातीचे राजकारण करतात. दोन समाजांत तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेतात. निवडणुकांच्या काळात मतदारांना दारू अन् पैसा दिला म्हणजे आपण जिंकलो, असे त्यांना वाटते. मात्र, दिल्लीतील विजयाने अशा नेत्यांची हवा ‘आप’ने काढून घेतली आहे. महाराष्‍ट्रात आम्हाला जातीपातीचे घाणेरडे राजकारण करायचे नाही. अशा नेत्यांना येत्या निवडणुकीत आम्ही धडा शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आपचे मराठवाड्याचे प्रभारी शकील अहमद, हरमित सिंह, अ‍ॅड. लक्ष्मण प्रधान पाटील, किरण पाटील, भीमराव वाघमारे, दत्तू पवार यांच्यासह सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयाजी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

उमेदवार कोणीही नाही
‘आप’चे अनेक कार्यकर्ते पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यासारखे वागत आहेत, अशा तक्रारी कानावर आल्या आहेत. काही जण मला सोलापूरमधून, तर काही अहमदनगरमधून पक्षाचे तिकीट मिळाल्याचे सांगतात. मात्र, पक्षाकडून अद्याप कोणालाही तिकीट वाटप झाले नसल्याचे सांगत कोणी असे बॅनर लावले, तर त्याचे फोटो माझ्याकडे पाठवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यांनी केला प्रवेश
या मेळाव्यात 50 पेक्षा जास्त नागरिकांनी पक्षात प्रवेश केला. यात एच. एम. शेख, कृषितज्ज्ञ अजहर पठाण, माजी एसीपी एस.के.कादरी, अन्न व औषध विभागाचे माजी आयुक्त समीउल्ला ख्वाजा, गोपीनाथ वाघ, राष्ट्रवादीचे भीमराव तारो, मनसेचे गंगाधर नखाते, आझाद मित्रमंडळाचे प्रमुख शेख जावेद शेख रज्जाक, प्रमोद नरवडे, कडुबा हिवाळे पाटील, नवनाथ कलंत्रीकर आदींसह फुलंब्री तालुक्यातून 20 जणांनी प्रवेश केला.