आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथाघरची उलटी खूण, दोन पालख्या निघणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणार्‍या पालखीचा सोहळा दोन दिवसांवर असतानाच पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या वारसांचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. नाथांची पालखी व पादुका श्रीकृष्णबुवा भागवतबुवा गोसावी यांनी रघुनाथबुवा गोसावी यांच्याकडे हस्तांतरित कराव्यात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिले. रघुनाथबुवांना पालखीचे अधिकार मिळून 42 वर्षांच्या वादावर पडदा पडला असतानाच आपण दुसरी पालखी पंढरपूरला नेणार असल्याचे शशिकांतबुवा गोसावी यांनी जाहीर केले. शनिवारी सकाळी 11 वाजता पालखी रवाना होणार आहे. दिंडीचे यंदाचे 414 वे वर्ष आहे.
नाथ महाराजांच्या वारसाचा वाद 1971 पासून सुरू होता. पैठणच्या दिवाणी न्यायालयाने 15 एप्रिल 1977 रोजी रघुनाथबुवांकडे अधिकार प्रदान केले होते. नाथवंशजांनी त्यास जिल्हा न्यायालयात आव्हान दिले. त्यावर रघुनाथबुवांनी 1980 मध्ये उच्च न्यायालयात दुसरी आव्हानयाचिका दाखल केली. ती विरोधात गेल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तत्पूर्वी, धर्मदाय आयुक्तांच्या 1974 मधील अपिलावरून 18 एप्रिल 1995 मध्ये जिल्हा न्यायालयाने नाथ मंदिर विश्वस्त समिती बरखास्त केली होती. त्याविरुद्ध सर्व नाथवंशजांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने 2 एप्रिल 1997 रोजी हंगामी आदेश काढून रघुनाथबुवांचे दत्तकविधान सिद्ध होईपर्यंत त्यांचा वारसदार म्हणून अधिकाराचा विचार करता येणार नसल्याचे म्हटले होते.
रघुनाथबुवांनी 2003 मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर त्यांच्या दत्तक विधानासंबंधी अंतिम निकाल लागेपर्यंत पालखी व पादुका श्रीकृष्णबुवांच्या ताब्यात देण्याचे अंतरिम आदेश दिले होते. त्यानंतर 29 जानेवारी 2013 रोजी रघुनाथबुवांचे दत्तक विधान ग्राह्य धरले. त्यामुळे पालखीचे अधिकार रघुनाथबुवांना मिळाले परंतु, श्रीकृष्णबुवांकडून पालखी व पादुका हस्तांतरित केल्या जात नव्हत्या. त्यामुळे रघुनाथबुवांच्या वतीने खंडपीठात विनंती अर्ज करण्यात आला. त्यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी बुधवारी वरील आदेश दिले. रघुनाथबुवांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित, अ‍ॅड. ए. एम. डबीर यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. राहूल धसे यांनी सहाय्य केले. श्रीकृष्णबुवातर्फे अ‍ॅड. प्रकाश परांजपे यांनी काम पाहिले.

वारसाच्या वादातून वेगळी पताका

प्रकरण काय?
नाथवंशज नारायणबुवा गोसावी यांच्याकडेच आषाढी दिंडीचे अधिकार व मान होता. सर्वोच्च् न्यायालयाने नारायणबुवा तथा लक्ष्मीबाई गोसावी यांचे दत्तकपुत्र रघुनाथबुवा हेही नाथांचे वंशज असल्याचा निर्णय दिला. त्यांना मान बहाल करण्यात आला. तत्पूर्वी, संस्थानाधीश रावसाहेब महाराज, नाथवंशजांकडे मान होता.

कोर्टाचा निर्णय
० श्रीकृष्णबुवांकडून पालखी व पादुका रघुनाथबुवांकडे हस्तांतरित केल्या जाव्यात
० अधिकार हस्तगत करण्यात अडचण निर्माण झाल्यास रघुनाथबुवांनी शासनाकडे दाद मागावी

दहीहंडीतही झाला होता काला
नाथषष्ठीच्या वेळी यंदा रघुनाथबुवांनी दिंडी आधी मंदिरात नेल्याने रावसाहेब महाराजांनी दहीहंडी फोडण्यास नकार दिला होता. अखेर प्रशासनाने पुढाकार घेऊन हंडी फोडली होती.

पालखी, पादुका सुपूर्द करणार : शशिकांतबुवा
न्यायालयाचा आदर करून पालखी व पादुका रंगनाथबुवांकडे सुपूर्द केल्या जातील. तथापि, आमच्याकडेही नाथांच्या पादुका असून वारकर्‍यांच्या श्रद्धेखातर दुसरी पालखी नेण्यात येईल, असे शशिकांतबुवा गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निर्णयानुसार यंदाच्या वर्षापुरतेच पालखी व पादुका रघुनाथबुवांना दिल्या आहेत. नाथवंशज म्हणून आमचा हक्क अबाधित आहे. दत्तकपुत्र नाथवंशज होऊ शकत नाही, यासंबंधी सर्वोच्च् न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. 1971 ते 2001 या काळात दोन पालख्या जात होत्या, असेही त्यांनी सांगितले.