आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aashish Deshmukh Article About Haidarabad Muthi Sangram

पहाटे ६ वाजता तोफा धडाडल्या अन् शहर जागे झाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहाटे सहाची वेळ होती, १७ सप्टेंबर १९४८ चा दिवस होता. सगळे शहर झोपेतून जागे झाले ते तोफांच्या अन् रणगाड्यांच्या आवाजाने. शहरवासी घाबरून गेले, रझाकारांचा हल्ला तर नव्हे, असे काही काळ वाटले; पण थोड्याच वेळात शहरात गुलमंडीवर फटाक्यांची आतषबाजी झाली, इमारतींवर तिरंगा झेंडा डौलाने फडकू लागल्याचे दिसले अन् औरंगाबादकरांचा जीव भांड्यात पडला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशाने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा शेवट झाला तो मिलिटरी अॅक्शनने. १५ ऑगस्ट १९४७ रोजी अवघा भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला खरा; पण हैदराबाद प्रांत मात्र निझामाने सोडलेला नव्हता. मराठवाडाही त्या वेळी हैदराबाद विभागात येत होता. हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची बाजी लावून हैदराबाद मुक्तिसंग्रामात बलिदान दिले. निझामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यावर या शहराने जो स्वातंत्र्याचा पहिला सूर्य पाहिला त्याचे काही साक्षीदार आजही आहेत. त्यांनीच हे वर्णन सांगितले आहे.

ढोल-ताशे, मिरवणुका अन् तिरंगा
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती. दिल्लीहून सैनिकांच्या फौजा गुप्त मार्गाने आगेकूच करत मराठवाड्याच्या चारही बाजूंनी शिरणार होत्या. कोणत्या शहरात कधी शिरायचे याची खबर कॅम्पप्रमुखांना होती. महाविद्यालयीन तरुणांना मिलिटरीला रस्ता दाखवण्याचे काम दिलेले होते. या फौजा बहुतांश शहरांत उत्तररात्री व पहाटेच घुसल्या. सामान्य नागरिकांना याची कल्पना नव्हती. औरंगाबाद शहरातही भल्या पहाटे रणगाडे अन् तोफांचे आवाज धडाडले. फायरिंग सुरू झाले. रझाकारांची एकच दाणादाण उडाली. पहाटे सहा ते दुपारी तीनपर्यंत या शहरातील मिलिटरी अॅक्शन संपली. तोच शहरात एकच जल्लोष सुरू झाला. या भारत सरकारच्या फौजा असून आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचे भोंग्यातून सैनिकांनी जाहीर केले अन् आबालवृद्ध घरातून जल्लोष करत बाहेर पडले. तिरंगी झेंडे घेऊन जल्लोषात चौकाचौकांत मिरवणुका निघाल्या. मिठाई तयार करणाऱ्या दुकानदारांनी त्या दिवशी मिठाई शहराला अक्षरश: फुकट वाटली.
निझाम शरण आल्याची बातमी आली
१६ सप्टेंबरची रात्र निझाम सरकारची अखेरचीच ठरली, कारण कोणतीही कल्पना नसताना भारतीय सैनिकांचे रणगाडे शहरात चारही बाजूंनी घुसले. रझाकारांची त्या सैन्यापुढे पळता भुई झाली. तेव्हा वर्तमानपत्रांवर बंदी होती. रेडिओवरही निझाम सरकारचेच नियंत्रण होते; पण त्यावर हैदराबादला भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्यासमोर निझाम शरण आल्याची बातमी मात्र देण्यात आली. अनेक कॅम्पमधून स्वातंत्र्यसैनिक आपल्या औरंगाबादच्या घराकडे आले. अनेक तरुणांनी आपले घर दहा वर्षांनी पाहिले होते.

(ही माहिती शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ना. वि. देशपांडे, लक्ष्मीनारायण जैस्वाल, द.रा.मेढेकर, वसंतराव चौधरी यांनी दिली.)