आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमावास्येची धास्ती; शनिवारला पसंती..!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद तालुक्यातून 107 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर 170 अर्जांची शनिवारी विक्री झाली. तहसील कार्यालयात अर्ज विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गटांमधून 40 अर्ज आणि गणांमधून 67 अर्ज दाखल झाले. सोमवारपर्यंतच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने शनिवारी उमेदवारांची एकच धावपळ झाली.
रविवारी शासकीय सुटी तर सोमवार दुपार 1:08 वाजेपर्यंत अमावास्या असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारलाच पसंती दिली. यामुळे तहसील कार्यालयास जत्रेचे स्वरूप आले होते.
पैठण तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी 82 तर पंचायती समितीसाठी 133 जणांनी अर्ज दाखल केले. फुलंब्री तालुक्यातील 4 गटांसाठी 17 तर 8 गणासाठी 44 अर्ज, कन्नड तालुक्यातील गटांसाठी 58 तर गणांसाठी 99 अर्ज, सिल्लोड तालुक्यातील गटांतून 54, तर गणांतून 67 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
खुलताबाद तहसीलमध्ये कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. यावर संतप्त झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी पद्मश्री बैनाडे व तहसीलदार अनिता भालेराव यांनी जिल्हा कॉँग्रेसच्या महिला अध्यक्षा शोभाताई खोसरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ खोसरे यांना कार्यालयातून बाहेर काढले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले.