आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवे, लोणीकर मोर्चात मिरवून घेत आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठासमाज प्रथमच मोर्चे काढत आहे. अॅट्राॅसिटीचा त्रास, आरक्षण नसल्यामुळे शिक्षणापासून दूर राहण्याची भीती यामुळे सामान्य मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. परंतु डोळे दिपवणारी गर्दी बघून मराठा नेते, त्यात मिरवून घेत आहेत. त्यामुळे या गर्दीचे पुढे ते राजकारण करतील, अशी टीका सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. जालन्याच्या मोर्चात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मंत्री बबनराव लोणीकर हे सहभागी झाले होते. सत्तार यांचा या दोघांकडे अंगुलिनिर्देश होता.
मराठा समाजाच्या मागणीला आपला १०० टक्के पाठिंबा असल्याचे सांगतानाच ‘दिव्य मराठी’शी बोलताना सत्तार म्हणाले, मी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, तेथे मराठा समाज बहुसंख्य आहे. आतापर्यंत येथील सत्ताधारी हे मराठा समाजाचेच राहिले आहेत. तरीही माझ्या मतदारसंघातील मराठा समाजाचा विकास होऊ शकला नाही. सामान्य मराठ्यांना कोणीही वाली नाही. पुन्हा मुख्यमंत्रीही मराठा समाजाचा झाला तरी सरकार त्यांच्यासाठी काहीही करणार नाही, अशी भावना सामान्य मराठ्यांमध्ये झाली आहे. कोपर्डी हत्याकांडाने हा समाज अधिक चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहेत.
या गर्दीचा फायदा घेण्याबरोबरच स्वत:ची प्रतिमा तयार करण्यासाठी सोमवारी जालन्यात प्रदेशाध्यक्ष दानवे तसेच मंत्री बबनराव लोणीकर फिरत होते. ते सत्ताधारी आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी. सत्तेत असल्याने ते मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडावे.

राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावे
सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जर स्वत:च्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरत असतील हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. हा केवळ राजकारणाचाच भाग आहे. त्यांनी राजीनामा देऊन मग सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे. परंतु ते तसे करणार नाहीत, कारण त्यांना मराठा समाजाच्या गर्दीवर केवळ राजकारण करायचे आहे, असा आरोप सत्तार यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...