आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhaysingh Sandhu News In Marathi, Bhagtsingh, Divya Marathi

आपला देश शक्तिशाली होण्यासाठी मतदान करा,अभयसिंग संधू यांचे तरुणाईला आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहीद ए आझम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी केवळ भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती दिली नव्हती, तर त्यांना स्वतंत्र भारतात विषमता, गरिबीही नको होती. देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्षे होऊन गेली तरीही विषमता, गरिबी, जातिवाद कायम आहे. कारण देश घडवण्याची शक्ती असलेल्या मतदानाचा वापर अनेक जण करत नाहीत. हे चित्र बदलून आपला देश शक्तिशाली आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन भगतसिंग यांची पुतणे अभयसिंग संधू यांनी तरुणाईला केले.


मातृभूमी प्रतिष्ठान, सरदार कुलबीरसिंग ट्रस्टच्या वतीने शहीद दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात आयोजित युवक महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. त्या वेळी ते बोलत होते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कर्नल समीर राऊत, मानसिंग पवार, शहीद राजगुरू यांचे नातू विलास राजगुरू, जसवंतसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. अभयसिंग यांनी भगतसिंगांमध्ये बालपणापासून असलेल्या देशभक्तीच्या भावनेची अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले की, मतदानाचे शस्त्र आपल्याला स्वातंत्र्यानंतर मिळाले आहे. हे शस्त्र मिळवण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भारताला, लोकशाहीला प्रबळ करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे. प्रामुख्याने तरुणांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.


विचारांसोबत तयार होत गेली भारतमातेची मूर्ती
समारोप सोहळ्याची रचना अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आली होती. त्यात मान्यवरांच्या विचार मांडणीसोबत देशभक्तिपर गीतांची सांगड घालण्यात आली होती. व्यासपीठाच्या एका बाजूला प्रख्यात मूर्तिकार गणेश छत्रे भारतमातेची मूर्ती घडवत होते. हा प्रयोग सर्वांनाच भावला.

..आणि वातावरण झाले गंभीर
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्तिपर गाणी आणि नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. गायिका दीपा काळे यांनी सादर केलेल्या ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या गाण्याच्या वेळी वातावरण धीरगंभीर झाले होते. अजय शेंडगे आणि सहकार्‍यांनी ‘वंदे मातरम्’ या गीतावर जोशपूर्ण नृत्याचे सादरीकरण केले. त्यात फुलांचा, दिव्यांचा लक्षवेधी वापर केला होता. प्रिया राजपूत या बालिकेने सादर केलेल्या ‘भगतसिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में’ या सुंदर पोवाड्याने सर्वांची दाद मिळवली. भारत माता की जय आणि वंदे मातरम्च्या घोषात वातावरण दुमदुमून गेले होते.


नो युवर आर्मीचे प्रदर्शन
या वेळी भारतीय लष्कराच्या वतीने नो युवर आर्मी या शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एअरो मॉडेलिंग शो, 130 एमएम तोफांच्या रणांगणावरील तयारीचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले.