आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा देणारा नापास, देणारा पास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभागाच्या एम. ए. प्रथम वर्षाच्या एका पेपरमध्ये गैरहजर विद्यार्थ्याला उत्तीर्ण तर उत्तीर्ण विद्यार्थ्याला गैरहजर दाखवण्यात आले. ‘कंपेरेटिव्ह पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ असे पेपरचे नाव असून गैरहजर विद्यार्थ्याला ‘बी’ ग्रेडने उत्तीर्ण केले आहे.

अर्जुन शंकर बनसोडे या विद्यार्थ्याने एम. ए. प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा नोव्हेंबर-२०१४ मध्ये दिली. ‘कंपेरेटिव्ह पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (पेपर कोड क्रमांक-४२१) या पेपरसाठी ( बैठक क्रमांक पीडीए-००१००१) हा विद्यार्थी परीक्षेला हजर होता. निकालानंतर मात्र बनसोडेला धक्काच बसला. मार्क्समेमोवर गैरहजरचा शेरा मारून अनुत्तीर्ण ठरवण्यात आले. बनसोडेने परीक्षेला हजर असल्याचा दावा करून दुरुस्त मार्क्समेमो देण्याची मागणी विभागप्रमुख डॉ. सतीश दांडगे यांच्याकडे केली होती. शिवाय सहायक प्राध्यापिका डॉ. ज्योती धायगुडे यांच्याही निदर्शनास आणून दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे, अविनाश राजेंद्र बन्सवाल (बैठक क्रमांक-पीडीए ००१००२) या विद्यार्थ्याला याच विषयात गैरहजर असताना हजर दाखवून उत्तीर्ण केले. बन्सवालनेदेखील आपण गैरहजर असल्याचे सांगत मार्क्समेमो दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर दोघांनाही आता दुरुस्त मार्क्समेमो शुक्रवारी दिल्याची माहिती आहे.

डॉ. ज्योती धायगुडे यांनी तो पेपर शिकवला असून अर्जुन बनसोडे आणि अविनाश बन्सवाल यांचे बैठक क्रमांक एका खाली एक होते. शिवाय बनसोडे आणि बन्सवाल यांच्या अडनावातही साधर्म्य आहे. त्यामुळे ही चूक झाली असावी त्यामध्ये कुणीही मुद्दाम केलेले नसल्याचे स्पष्टीकरण डॉ. दांडगे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी त्यांना नवे मार्क्समेमो दिल्याचेही त्यांनी म्हटले.

सर्व विभाग स्वायत्त असल्यामुळे परीक्षा घेणे, निकाल जाहीर करण्याचे काम विभागाच्या वतीनेच केले जाते. अशा पद्धतीच्या चुका विभागाकडून होतात. त्यांच्या मार्क्समेमोमध्ये दुरुस्तीच्या सूचना येतात. त्याप्रमाणे दुरुस्त करून दिले जाते. यात परीक्षा विभागाचा काहीच दोष नाही -डॉ.प्रल्हाद लुलेकर, परीक्षा नियंत्रक.

दोघांच्या मार्क्समेमोमध्ये चुका झालेल्या होत्या. मात्र त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेच दुरुस्त करून त्यांना नवे मार्क्समेमो दिले. आता विद्यार्थ्यांची काहीच तक्रार नसल्यामुळे वृत्त प्रसिद्ध करण्यात काहीच अर्थ नाही -डॉ. ज्योती धायगुडे, सहायक प्राध्यापिका