आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलिगड विद्यापीठ बंद करा, अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री बोरीकरांची मूलतत्त्ववादावर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अलिगड मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) शिक्षणाच्या नावाखाली देशद्रोही कारवाया चालतात. त्यामुळे या विद्यापीठाचे खुलताबादेत उपकेंद्र करणे तर सोडाच ‘त्या’ विद्यापीठालाच टाळे ठोकावे, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे. हवे असल्यास सरकारने आमच्याकडून पुरावे घ्यावेत, असे खुले आव्हान अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री श्रीहरी बोरीकर यांनी दिले. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले आहेत, "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी खास बातचीत केली.
अलिगड विद्यापीठात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबींकडे कमी आणि इतर भानगडीकडे अधिक लक्ष असते. देशविरोधी कृत्य करणे, जातीय, हिंसक पत्रके वितरित करणे, समाजात तेढ निर्माण होईल, अशी कामे करण्यातच त्यांचा वेळ जातो. त्यामुळे आम्ही पाटणा येथे (एएमयू) उपकेंद्र करण्यास विरोध केला होता. तसेच खुलताबादेतही उपकेंद्र करण्यास अभाविपचा कडाडून विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विद्यार्थी परिषदेने विरोध दर्शवला आहे. जात आणि धर्माच्या अाधारे आरक्षणाची तरतूद नसावी, मात्र अजूनही विकासापासून वंचित घटकाला आरक्षण द्यावे, अशी परिषदेची भूमिका आहे. शिक्षणातील कंत्राटी पद्धतीला कायमचे हद्दपार करण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
उच्चशिक्षणातील गुणवत्ता टिकवण्यासाठी कंत्राटी शिक्षक नेमण्याचे धोरण बदलावे, यासाठी सरकारकडे आग्रह धरण्यात येईल, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची अभाविपची तयारी आहे. परिषदेचे कार्यकर्ते म्हणजे निवडणुकीत पोलचीट वाटण्यासाठीची यंत्रणा असल्याची नेहमी टीका केली जाते, पण हे धादांत खोटे असून आम्ही लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करत असतो. देशभक्त उमेदवारांना मतदान करावे यासंदर्भातील जनजागरण करत असतो. भाजपचे पोलचीट वितरित करणारी ही यंत्रणा नाही, असे त्यांनी निक्षूण सांगितले. सोशल मीडियातून नरेंद्र मोदींवर होणारी टीका हे विरोधी पक्षांचे कटकारस्थान आहे. ‘अच्छे दिन’साठी आपल्याला काही काळ जाऊ द्यावा लागेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
अशी आहेत, आगामी काळातील धोरणे
प्रादेशिक विद्यापीठातील विद्यार्थी हा ग्रामीण भागातून आलेला असतो, त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाठी त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा म्हणजे निवास सुविधा, शिष्यवृत्ती आदी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहोत. कॉलेज, विद्यापीठांमध्ये कायम शिक्षकांची संख्या वाढवणे, कंत्राटी पद्धतीला कायमची मुठमाती देण्यासाठी अभाविप काम करणार आहे. देशाच्या हितासाठी संघटना नेहमी तत्पर असल्याचे मत या वेळी बोरीकर यांनी सांगितले.
अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ३५८ सदस्यांचा समावेश आहे. त्यांची बैठक औरंगाबादेत होत असून देशभरात ३३ लाख सक्रिय सभासद या संघटनेत कार्यरत आहेत. देशात ३५०० शाखा, ३७०० संपर्क स्थान, १५०० विस्तार केंद्रे आणि ७५०० कॉलेज युनिट असलेली ही विश्वातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असल्याचा दावा बोरीकर यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...