आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समांतर'च्या चौकशीचा चेंडू अँटी करप्शनच्या कोर्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या दहा वर्षांपासून कायम चर्चेत असलेल्या समांतर जलवाहिनीच्या चौकशीचा चेंडू आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोर्टात गेला आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यासोबत कराराची मूळ प्रत तसेच अन्य कागदपत्रेही जोडली आहेत. एसीबीला चौकशीसाठी आणखी कागदपत्रे लागत असल्यास वेळोवेळी ती दिली जातील, असेही ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
इम्तियाज जलील यांनी आधी दीक्षित यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी लेखी तक्रार केली. योग्य ती कागदपत्रे असतील तरच चौकशी होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे इम्तियाज यांनी तशी कागदपत्रे जमा केली आणि त्यानंतरच चौकशीचा चेंडू या नव्या संस्थेच्या कोर्टात नेऊन ठेवला. आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर लगेचच त्यांनी "समांतर'च्या मुद्द्याला हात घातला होता. त्याचबरोबर निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी कृष्णकांत भोगे, प्रा. विजय दिवाण यांची एक समिती गठित करून "समांतर'मध्ये नेमके काय चालले याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या समितीचा अहवाल अजून आला नसला तरी जलील यांनी जमवलेली कागदपत्रे सोबत घेऊन एसीबीचे कार्यालय गाठले. एसीबीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असती; परंतु त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. त्यामुळेच दीक्षितांसारख्या कर्तव्यकठोर व्यक्तीकडे आपण तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
नफा कमावणे पालिकेचे काम नाही : समांतरच्यामाध्यमातून पालिकेने पाण्याचा धंदाच लावला आहे. त्यातून ठेकेदार तसेच पालिका नफा कमावू पाहते आहे. पालिका ही नफा कमावणारी संस्था नव्हे. त्यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा द्यायच्या असतात; पण पालिकेला आपल्या मूळ उद्देशाचाच विसर पडला आहे. अवघ्या ८५० रुपयांना मिळणारे पाण्याचे मीटर नागरिकांना साडेतीन हजारांना देण्यात येते. मूळ मीटरची खरेदी पावती मी घेतली आहे. नागरिकांना गंडवण्याचा प्रकार थांबवला जावा यासाठी आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपला उशिरा जाग
एमआयएम या पक्षाला भाजपची मदत असल्याची चर्चा शहरात आहे. मात्र, इम्तियाज जलील यांनी याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले, मी लोकप्रतिनिधी झाल्यापासून या मुद्द्याला हात घातला. मात्र, भाजपला उशिरा जाग आली. आम्हाला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. भाजपच काय, शिवसेनेतील काही जण आमच्या भूमिकेला खासगीत पाठिंबा देतात. नागरिकांची लुबाडणूक रोखण्यासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागतच असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...