आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेकंदाची घाई; ट्रकच्या धडकेने शेतकरी दांपत्याचा करुण अंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भरधाव ट्रकच्या धडकेने पैठण तालुक्यातील शेतकरी दांपत्याचा करुण अंत झाल्याची घटना शनिवारी बीड बायपासवरील देवळाई चौकात दुपारी एक वाजता घडली. या भीषण अपघातात अडीच वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून दुसरी चार वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली. सिग्नलचा अंदाज आल्याने अवघ्या पाच सेकंदांच्या घाईमुळे या चिमुरड्यांचे छत्र हिरावले.
शेख फहीन शेख अलीम (३०, पारुंडी, ता. पैठण) हे पत्नी सरिना शेख (२७), मुलगा फरहान (वय अडीच वर्षे) मुलगी झरीन (४) यांच्यासह उपचारासाठी शहरात आले होते. कैलासनगर भागात संजयनगर येथे शेख फहीन यांंची सासुरवाडी आहे. दुपारी एकच्या सुमारास देवळाई चौकातून ते दुचाकीवरून (एमएच २० सीबी १२४६) शिवाजीनगरच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. जालन्याकडून येणाऱ्या ट्रकचा (जीजे २० यू ६७७७) त्यांंना अंदाज आला नाही. सिग्नल सुटल्यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकखाली फहीम यांची दुचाकी आली. ट्रकने दुचाकी १५ ते २० फुटांपर्यंत फरपटत नेली. यात फहीन यांच्यासह पत्नी सरिना यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांनी जागीच प्राण सोडला. अडीच वर्षांचा फरान गंभीर जखमी झाला तर मुलगी झरीन किरकोळ जखमी झाली. प्रत्यक्षदर्शींनी फरान झरीन यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळपर्यंत जरीनला घरी सोडण्यात आले तर फरानची तब्येत गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. फहीन सरिना यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिग्नलच्या रंगांचा अंदाज चुकला अन्...
देवळाई चौकातील सिग्नल हे चौकापासून अलीकडे आहेत. त्यामुळे सिग्नल ग्रीन झाल्यानंतर चौकात पोहोचेपर्यंत ऑरेंज लाइट लागतो. शनिवारी सिग्नल सुटताच जालन्याकडून येणारी वाहने चौकातून पुढे निघाली. फहीन हे शिवाजीनगरकडे जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना त्यांच्या दिशेने लागलेल्या सिग्नलचा अंदाज आला नाही. अवघ्या पाच सेकंदांत ही घटना घडली. अपघातानंतर जमावाने ट्रकचालकाला मारहाण केली.

धान्याचा व्यवसाय
फहीनयांची गावाजवळ शेती असून आठवडी बाजारात धान्य विकण्याचा व्यवसाय ते करत होते. त्यांना एकूण तीन मुले असून पैकी दोघांना त्यांनी सोबत आणले होते. सहा वर्षांची मुलगी घरीच होती.

दुभाजक तोडले
महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेले सिग्नल गुरुवारी सुरू करण्यात आले. सिग्नल बसवल्यामुळे येथे पूर्वी उभारलेले दुभाजक तोडण्यात आले आहेत. त्यामुळे सिग्नल सुटले की देवळाई चौकातून वाहने वेगाने धावतात. परिणामी दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढतच आहे.
बातम्या आणखी आहेत...