आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वीकृतच्या नियुक्त्या होणार काँग्रेसमुक्त, भाजपच्या चालीचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वीकृत नगरसेवकांसह इतर समित्यांत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून शिवसेनेला चेकमेट देण्यासाठी भाजपने गजानन बारवाल यांच्या नेतृत्वाखाली १३ अपक्षांची शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्या या चालीमुळे तूर्तास स्वीकृत नगरसेवकांची निवड काँग्रेसमुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मनपात पाच गटांची अधिकृत स्थापना झाली असून आता पालिकेतील सत्तापदे याच गटांत वाटली जाणार आहेत.

महापालिकेत शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा हेतू असफल झाला असला तरी त्यांनी स्वीकृत, स्थायी समिती, विषय समित्यांत जास्त जागा मिळवता याव्यात यासाठी शिवसेनेला बाजूला ठेवत दोन गट स्थापन केले. भाजपचा एक अधिकृत गट पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या २२ नगरसेवकांचा आहे, तर नुकतेच भाजपत गेलेले गजानन बारवाल यांच्या नेतृत्वाखाली १३ अपक्षांची मोट बांधून शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. अशा तऱ्हेने ४५ नगरसेवकांची बेगमी करत भाजपने स्वीकृत नगरसेवकांसाठी दोन जागा मिळतील, अशी फिल्डिंग लावली. अपक्षांना सोबत घेत शिवसेनेने ४१ जणांचा गट स्थापन केला. आता या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन स्वीकृत नगरसेवक राहणार आहेत, तर एमआयएमचा एक असेल.

संतप्त अफसर खान तटस्थ
भाऊसाहेब जगताप यांचे नाव गटनेतेपदासाठी जाहीर करताच अफसर खान संतापल. त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, निवडणुकीत मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान केले नाही याचा राग धरून आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मला डावलले. मी चार वेळा नगरसेवक राहिलो आहे. जगताप खूप ज्युनियर आहेत. त्यांच्या हाताखाली मी काम करू शकत नाही. आता मला विरोधी पक्षनेतेपदातही रस नाही, असे ते म्हणाले. दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने अयुब खान यांचे नाव जाहीर केले आहे.

हे असतील गटनेते
>शिवसेना : नावाची शिफारस नाही
>भाजप : भगवान घडामोडे
>शहर विकास आघाडी : गजानन बारवाल
>एमआयएम : नासेर सिद्दिकी तकिउद्दीन
>काँग्रेस-राष्ट्रवादी : भाऊसाहेब जगताप

राष्ट्रवादी फोडली
भाजपने राष्ट्रवादीच्या दोघांना सामावून घेतले. बसपचेही दोन नगरसेवक त्यांनी घेतले आहेत. राष्ट्रवादीचा एक नगरसेवक काँग्रेसच्या गटात गेल्याने तो गट काँग्रेस - राष्ट्रवादीचा झाला.

काँग्रेसचा सफाया
स्वीकृत नगरसेवकासाठी संख्याबळानुसार २२.६ नगरसेवकांच्या मागे १ असे प्रमाण पडते. काँग्रेसचे बळच १० वर अडकल्याने स्वीकृतची पाच जणांची टीम काँग्रेसमुक्त असेल. स्थायी समितीतही ४१ जणांमुळे शिवसेनेचे ६ सदस्य राहतील तर भाजप व शहर विकास आघाडीमुळे भाजपला पाच सदस्य देता येतील. काँग्रेसचा एकमेव सदस्य स्थायीत जाऊ शकतो, तर एमआयएमचे ४ सदस्य असतील.
बातम्या आणखी आहेत...