आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धवट सोडलेल्या रस्त्यावर अवैध घुसखोर ट्रकने महिलेचे पाय चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर प्रवेशाला बंदी असतानाही अवैधपणे शहरात घुसखोरी करून वाळूने भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन महिलेला कायमचे अपंग केले. अर्धवट सोडलेल्या रस्त्यावर झालेल्या या अपघातात ट्रकचे पुढचे चाक महिलेच्या पायावर गेल्याने ती गंभीर जखमी झाली. एक पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागला. तर दुसरा पाय वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुंडलिकनगर चौकात ही घटना घडली. नेहा संजय जोशी (४०,रा. अरुणोदय कॉलनी, बीड बायपास) असे जखमी महिलेचे नाव आहे.
जय भवानी नगर येथे झालेल्या या अपघातात जखमी झालेली समीरणची आई नेहा यांच्यावर हेडगेवार हॉस्पिटलामध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. त्यांचा डावा पाय पूर्णत: निकामी झाल्याने काढून टाकण्यात आला. तर गंभीर इजा झालेला उजवा पाय वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेवर पाेहाेचली नसल्याची तक्रार प्रत्यक्षदर्शींनी केली.

गजानन मंदिर ते पुंडलिक नगर रोडवर सध्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. हनुमान नगर चौकापर्यंत एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. बीड बायपासवरील दत्त नगर, अरुणोदय कॉलनी येथील नेहा संजय जोशी (४०) या मुलाला घेऊन प्लेझर दुचाकीवर (एम़एच़२०, सीबी ८१६१) पुंडलिकनगरमार्गे जयभवानीनगरकडे जात होत्या. पुंडलिक राऊत चौकापासून रस्ता बंद असल्याने दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर जाण्यासाठी गाडी वळवताच पाठीमागून भरधाव आलेल्या वाळूच्या ट्रकने (एमएच २०, डीई ९८८२) नेहा यांच्या दुचाकीला धडक दिली. समीरण, नेहा रस्त्यावर पडले. नेहा यांचे दोन्ही पाय ट्रकच्या समोरील चाकाखाली सापडले. आरडाओरड होताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. पोलिसांनी हायवा ट्रक जप्त केला असून याप्रकरणी पुंडलिकनगर चौकीत समीरणच्या तक्रारीवरून चव्हाण नामक चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे पुढील तपास करीत आहेत.
उशिरासुचले शहाणपण : पुंडलिकनगर भागात सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. तिरुमला मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम झाले आहे. मात्र ज्या ठिकाणाहून रस्ता सुरु होतो तेथे जमीन आणि रस्ता यात किमान दीड फुटाचे अंतर आहे. त्यामुळे दुचाकीस्वार एकाच बाजूने जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही होते. अपघात झाल्याचे कळताच तासाभरात या चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. भर टाकून खड्डाही बुजवला होता. हाच शहाणपणा आधी दाखवला असता तर जोशी यांचे पाय वाचले असते, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांत उमटल्या.

फक्त रक्त आणि आईच्या पायाचा मांसाचा लटकलेला गोळा दिसत होता
सकाळीसाडे दहा वाजता मी आणि माझी आई माझं लिखाण सरांना दाखवण्यासाठी जय भवानी नगर येथे जात होतो, पुंडलिक नगर चौकात रस्ता खराब होता. सगळे ज्या रस्त्याने जात होते त्याच रस्त्याने आम्हीही जात होतो. आई गाडी चालवत होती. अचानक मोठा ट्रक आमच्या अंगावर आला. त्याच्या धडकेने मी डाव्या साईडला डिव्हायडरवर पडलो आणि उजव्या साईडला आई पडली. तिच्या पायावर तो मोठा ट्रक आला. काय झाले काहीच कळले नाही. फक्त रक्त आणि आईच्या पायाचा मांसाचा लटकलेला गोळा दिसत होता. आम्ही रस्त्याने चाललो होतो, यात आमचा काय दोष, अशी आपबीती नेहा यांचा मुलगा समीरणने ‘दिव्य मराठी’ला सांगितली.

ट्रक शहरात शिरलाच कसा?
सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत शहरात प्रवेश बंदी असताना वाळूचा ट्रक थेट पुंडलिकनगर चौकापर्यंत आलाच कसा?. संग्रामनगर उड्डाणपुलाकडून पुंडलिकनगरकडे येताना चार चौक आणि एक पोलिस ठाणे लागते. तरीही ट्रक आलाच कसा? असा सवाल आहे. दरम्यान अर्धवट रस्ता ठेवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कामगार मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राम बताडे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...