आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये विचित्र अपघात; दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रस्ता ओलांडणार्‍या मुलाला धडक देऊन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेम्पोचालकाने तीन दुचाकी वाहनांना उडवले. जळगावर रोडवर सकाळी साडेअकराला घडलेल्या या विचित्र अपघातात सहा जण जखमी झाले. जखमी बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर घाटीत तर अन्य जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने टेम्पोवर तुफान दगडफेक केली.

सिडको बसस्थानकाहून हसरूल टी पॉइंटकडे जाणार्‍या एका अँपेरिक्षातून रमेश विधाने, त्यांची पत्नी आणि मुलगा शुभम वोक्हार्ट कंपनीसमोर उतरले. रस्ता ओलांडत असतानाच नारेगावहून गारखेड्याकडे मजूर घेऊन जाणार्‍या भरधाव टेम्पोने (एमएच-16-बी-3560) शुभमला धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या विरुद्ध दिशेने टेम्पो नेला. याच वेळी सिडको बसस्थानकाहून हर्सूल टी पॉइंटच्या दिशेने बुलेटवर (क्र. एमव्हीई - 6116) जाणार्‍या सोनू ऊर्फ प्रवीण शेजूळ (28, रा. भावसिंगपुरा) आणि सतीश दत्तात्रय थोरात (20, रा. मांडकी) यांच्यासह संपत कचरू जाधव (27, रा. मिटमिटा) व गजानन रामलाल यादव (40, रा. नागेश्वरवाडी) यांची डिस्कव्हर दुचाकी (एमएच-20-सीडी-9827) आणि विवेक जहागीरदार यांच्या अँक्टिव्हा होंडालाही टेम्पोने धडक देत तिन्ही वाहने शंभर फुटांपर्यंत फरफटत नेली.

संतप्त जमावाचा उद्रेक - हा अपघात घडताच घटनास्थळी मोठा जमाव जमला आणि तुफान दगडफेक सुरू झाली. तोपर्यंत टेम्पोचालक पसार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच सिडको पोलिस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर टेम्पोतील मजूर दादाराव साठे हा जामावाच्या रोषाला बळी पडला. त्याला जमावाने बेदम मारहाण केली. जमावाच्या तावडीतून त्याची सुटका करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या अपघातामुळे वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. या अपघाताची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.