आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेसाठी जाताना उपवधूचा अपघातात मृत्यू; दहा दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रथमा सुभाष वाटोरे (२४) ही तरुणी पडेगाव येथील माजी सैनिक काॅलनीत राहत होती. दहा दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता. एक महिन्यावर लग्न येऊन ठेपले होते. पण सासरी जाण्यापूर्वी तिला अधिकारी व्हायचे होते. म्हणून ती शनिवारी दुपारी दोन वाजता चिकलठाणा एमआयडीसी येथील एका परीक्षा केंद्रावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी आॅफिसर पदाची पूर्वपरीक्षा देण्यासाठी निघाली आणि काळाने तिच्यावर झडप घातली. धाकटा भाऊ सचिन दुचाकीवरून तिला परीक्षा केंद्रावर नेत होता. अमरप्रीत चौकात त्याच्या दुचाकीसमोरील एका वाहनाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सचिननेदेखील ब्रेक लावले आणि पाठीमागे बसलेली प्रथमा खाली पडली. याचदरम्यान पाठीमागून येणारी कार तिच्या अंगावरून गेली आणि ती गतप्राण झाली. 

प्रथमाचा १७ एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. २८ मे रोजी लग्नही ठरले होते. एवढेच नव्हे तर लग्नापूर्वीच तिला बँकेत अधिकारी व्हायचे होते. घरामध्ये प्रत्येक जण व्यग्र होता. लग्नपत्रिकांच्या पसंतीचा विषयही झाला होता. प्रथमाच्या आयुष्यात सर्वच चांगला योग जुळून आला होता. पण तिला काय माहीत काळ तिच्यासाठी मृत्यू घेऊन येणार म्हणून... झाले असे की, परीक्षा दुपारी दोन वाजता असल्यामुळे केंद्रावर एक तास आधी पोहोचणे अनिवार्य होते. त्यामुळे तिने सचिनला दुचाकी काढायला सांगितली. दोघे बहीण-भाऊ (एमएच २० सीव्ही ७९१६) या दुचाकीवरून पडेगाव येथून निघाले. क्रांती चौक उड्डाणपूल ओलांडल्यानंतर अमरप्रीत चौकात आले. सिग्नल सुटल्याने सर्व वाहने भराभर निघाली. सिग्नल ओलांडताच सचिनची दुचाकी साधारण तीस ते चाळीस फूट पुढे गेली आणि त्यांच्यासमोर असलेल्या एका वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबले. अपघात टाळण्यासाठी अापसूकच सचिनलाही ब्रेक दाबावे लागले. ब्रेक लागताच प्रथमाचा तोल गेला आणि ती क्षणार्धात खाली पडली. अमरप्रीत चौकाच्या दिशेने आकाशवाणीकडे भरधाव जाणारी कार तिच्या अंगावरून गेली आणि ती गंभीर जखमी झाली.

सचिनही जखमी झाला. बघता बघता चौकात गर्दी जमली. काही लोकांनी जखमी तरुणीला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. सायंकाळी उशिरा क्रांती चौक पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. प्रथमाचे वडील लष्करातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. तिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...