आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: औरंगाबादमध्ये सिग्नल मिळताच टँकर सुसाट, एकाला चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जालनारोडवरील महर्षी दयानंद चौकात (दूध डेअरी चौक) रविवारी सकाळी ११ वाजता झालेला अपघात पाहून बघ्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. पाण्याच्या टँकरखाली सापडून दुचाकीवरील एकवीसवर्षीय तरुण जागीच ठार झाला. त्याच्या मेंदूचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. सुदैवाने या दुचाकीवरील दुसरा तरुण बचावला. हात फ्रॅक्चर होऊन त्याच्या जिवावरील संकट टळले. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला.
विशाल रामदास जंगले (२१, रा. पळसगाव, ता. खुलताबाद) असे मृत तरुणाचे, तर नीलेश भोसले (१९, रा.पळसगाव, ता. खुलताबाद) असे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी नीलेशवर घाटीत उपचार सुरू आहेत.

पळसगाव येथील विशाल आणि नीलेश हे दोघेही जिवलग मित्र. विशाल हा जळगाव येथील गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील पळसगाव येथे शेती करतात. त्याला एक लहान बहीण आहे, तर नीलेश हा खुलताबाद येथील एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेतो. नीलेशने काही दिवसांपूर्वी नवी दुचाकी (एमएच-२०-डीए-८७३३) खरेदी केली होती.
तीन-चार दिवसांपूर्वी वापरण्यासाठी घेतली होती ती दुचाकी
तीन-चार दिवसांपूर्वी ती विशालने वापरण्यासाठी घेतली होती. विशालकडून दुचाकी पडल्याने तिचे किरकोळ नुकसान झाले होते. विशालने तिची दुरुस्ती करून देण्यास सहमती दर्शवली होती; परंतु नीलेशने आपण स्वत: दुचाकीची दुरुस्ती करून घेऊ, असे सांगितले. विशालने शोरूममध्येच दुचाकीची दुरुस्ती करून घेऊ, असा हट्ट केला होता. त्यामुळे ते दोघेही रविवारी (दि. १८) औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील शोरूमकडे निघाले होते. विशाल हा दुचाकी चालवत होता, तर नीलेश मागे बसला होता. सकाळी ११ च्या सुमारास ते क्रांती चौकमार्गे दूध डेअरी चौकात आले असता तेथे सिग्नल लागल्याने विशालने दुचाकी थांबवली. सिग्नल सुटताच सर्व वाहने धावू लागली. तेवढ्यात मागून आलेल्या पाण्याच्या टँकरने (एमएच २० एफ ५४९३) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडले. टँकरचे चाक विशालच्या डोक्यावरून, तर नीलेशच्या हातावरून गेले. यात विशाल जागीच गतप्राण झाला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विशालने जीव वाचविण्याची केली होती धडपड आणि घटनेशी संबंधित काही फोटोज...