आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Mini Truck, Parbhani, Divya Marathi

परभणीच्या तरुणीचा मिनी ट्रकच्या धडकेत अंत, पोलिसांनी चालकाच्या मुसक्या आवळल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बर्फाच्या लाद्यांनी भरलेल्या भरधाव मिनी ट्रकने पोलिस आयुक्तालयासमोरून जाणार्‍या तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पूजा विलास येडे (22, हर्षनगर, परभणी) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता घडली. पोलिसांनी टेम्पोचालक शेख हुसेन शेख अब्दुल्ला (40, रा. नायगाव) याच्या मुसक्या आवळल्या.


परभणीहून आल्यानंतर पूजा व तिचा मित्र शंकर र्शीधर मुंडे (23, रा. परभणी) हे दोघे पल्सरवर (एमएच 20 सीबी 7760) मकबरा पाहण्यासाठी मिल कॉर्नरहून जात होते. दुपारी 1 वाजता आयुक्तालयासमोरून जात असताना शंकरने गतिरोधकाजवळ दुचाकीचा वेग कमी केला. याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मिनी ट्रकने (एमएच 20 एटी 7952) धडक देत दुचाकीला पाच फुटांपर्यंत फरपटत नेले. मोठा आवाज आल्याने वाहतूक पोलिसासह उपस्थित सर्वांनी त्या दिशेने धाव घेतली. या अपघातात पूजाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर शंकरच्या उजव्या हाताला आणि पायाला जबर मार लागला. काही पोलिसांनी जखमी पूजा आणि शंकरला तत्काळ घाटीत दाखल केले. मात्र, रस्त्यातच पूजाची प्राणज्योत मालवली. बारावीनंतर पूजाने उस्मानाबाद येथील कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वर्षभरात दुसरा अपघात
23 मे 2013 रोजी दुपारी तीनच्या सुमारास सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास भामरे आणि त्यांचे रायटर दराडे दुचाकीवरून पोलिस आयुक्त कार्यालयात येत होते. मिल कॉर्नरहून येणार्‍या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. यात भामरे यांची प्राणज्योत मालवली होती. या अपघातानंतरच तत्कालीन पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून पोलिस आयुक्तालयासमोरील दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.