आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Police Van, Shekhar Bankar, Divya Marathi

पोलिस व्हॅनच्या धडकेत तरुणाचा अंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन दुचाकींच्या किरकोळ धडकेनंतर तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या तरुणाला भरधाव पोलिस व्हॅनने चिरडले. यात शेखर पुंडलिक बनकर (28, रा. नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा) याचा मृत्यू झाला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सहायक उपनिबंधक कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृत शेखरचे वडील निवृत्त सहायक फौजदार आहेत.
शेखर सुरक्षा रक्षकाचे कंत्राट घेत होता. दुपारी पल्सर दुचाकीने (एमएच 20 एएन 9789) बाबा पेट्रोलपंपाकडून घराकडे जात असताना त्याच्या शेजारून दुचाकीवर एक अल्पवयीन मुलगा आला. त्या दुचाकीची धडक शेखरच्या दुचाकीला बसली. त्यामुळे शेखरचा दुचाकीवरील ताबा सुटला व तो रस्त्यावर पडला. तितक्यात आरोपीला घेऊन जाणार्‍या पोलिस व्हॅनने त्याला चिरडत पाच फुटापर्यंत फरपटत नेले. शेखरची दुचाकी व्हॅनच्या पाठीमागील चाकाखाली अडकली होती. अपघात घडताच अल्पवयीन मुलाने तेथून पळ काढला. त्यालाही जबर मार लागल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तेथून जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते सोमनाथ बोंबले यांनी शेखरला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. व्हॅनमध्ये आरोपी असल्याने वाहनातून पोलिस खाली उतरत नव्हते. 20 मिनिटांनंतर मात्र व्हॅनमधून एक पोलिस कर्मचारी खाली उतरला व चाकाखाली सापडलेल्या शेखरला बाहेर करण्याचा प्रयत्न केला; पण बोंबले यांनी शेखरला बाहेर काढले. घाटीत नेत असतानाच शेखरची प्राणज्योत मालवली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीपैकी एकानेही त्या व्हॅनचा क्रमांक नोंद केला नाही. पोलिसांनीही व्हॅनबाबत काही माहिती देण्यास नकार दिला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
..तर वाचला असता जीव
अपघात झाल्यानंतर व्हॅनमध्ये आरोपी असल्याने पोलिस कर्मचारी खाली उतरण्यास तयार नव्हते. 20 मिनिटे शेखर वेदनेने ओरडत होता. पण पोलिस कर्मचारी अथवा रस्त्यावरून जाणार्‍या कोणालाही त्याची कीव आली नाही. शेखरला लवकर उपचार मिळावेत म्हणून बोंबलेंनी भरपूर प्रयत्न केले. शेखरला चाकातून काढण्यासाठी बोंबले यांची पोलिस कर्मचार्‍यांशी बाचाबाचीही झाली. पोलिसांनी तत्काळ मदत केली असती तर शेखरचा जीव वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शेखर एकुलता एक
शेखरचे वडील पुंडलिक बनकर हे सहायक फौजदार होते. त्याला पाच बहिणी आहेत. त्यापैकी चौघींचा विवाह झाला असून सर्वात लहान बहीण पोलिस दलात शिपाई आहे. शेखर एकुलता एक मुलगा होता. त्याला एक वर्षाचा मुलगा आहे.